कोरोनाच्या अडीच वर्षानंतर सहलीनिमित्त ज्येष्ठ नागरिक पडले घराबाहेर
भिंगार येथील ज्येष्ठ नागरिक कोरोना महामारीच्या अडीच वर्षानंतर घराबाहेर पडून एकत्र येत जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र व निसर्गरम्य ठिकाणी सहल काढली. भिंगार ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सहलीला निघालेल्या ज्येष्ठ नागरिकांना हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव लोखंडे, सुभाष होडगे, दिपक बडदे, जयश्री बडदे, सुभाष गोंधळे, लता गोंधळे, अशोक दळवी, सुरेश कानडे, अनंता सदनापूरकर, सुधाकर चिदंबर, हरिचंद्र वडे, नवनाथ आमले, सुरेखा आमले, चंद्रकांत बोळे, राजू कांबळे आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, कोरोनाच्या भितीने अनेक ज्येष्ठ नागरिक दोन ते अडीच वर्षापासून कुठे जाऊ शकलेले नाहीत. सध्या कोरोनाचे संक्रमण कमी झालेले असताना एक विरंगुळा म्हणून ज्येष्ठ नागरिक सहलीच्या निमित्ताने घराबाहेर पडून एकत्र आले असल्याचे त्यांनी सांगितले. जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव लोखंडे यांनी भिंगारचे सर्व ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन विविध कार्यक्रम घेत असतात, तर वर्षातून दोनदा सहल काढतात. मात्र कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांचा कोणताही कार्यक्रम होऊ शकलेला नाही. तसेच ज्येष्ठ नागरिक एकमेकापासून दुरावले गेले होते. सहलीच्या माध्यमातून सर्व जुने मित्र एकत्र आल्याचा आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.