आरपीआयचे महापालिकेसमोर उपोषण

शहरातील जुना मंगळवार बाजार येथे असलेल्या हुसेन शाहवली बाबा दर्गा भोवती स्थानिक नागरिकाने केलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने महापालिकेसमोर उपोषण करण्यात आले. या उपोषणात आरपीआयचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष गुलाम अली शेख, कार्याध्यक्ष अजीम खान, इमरान शेख, सोनू शेख, संतोष पाडळे, जावेद सय्यद, भीम वाघचौरे आदी सहभागी झाले होते.


जुना मंगळवार बाजार येथे सुमारे दोनशे वर्षा पूर्वीची हुसेन शाहवली बाबा यांची दर्गा आहे. सदर दरगेवर हिंदू-मुस्लिम समाजाची श्रध्दा असून, सर्व समाजातील नागरिक दर्शन घेण्यासाठी दर्गावर येतात. परंतु ही दर्गा शहराच्या मध्यवस्तीत असल्याने दर्गे भोवती शेजारी राहणार्‍या कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे दर्गेवर दर्शनासाठी जाण्यासाठी भाविकांना जागा शिल्लक राहिलेली नाही. दर्गेला खेटून दोर्‍या बांधल्या असून, त्यावर दररोज महिला व पुरुषांचे कपडे वाळण्यासाठी टाकले जात असून, यामुळे दर्गाची विटंबना होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. जुना मंगळवार बाजार येथे असलेल्या हुसेन शाहवली बाबा दर्गा भोवती स्थानिक नागरिकाने केलेले अतिक्रमण हटवण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.