आरोपींच्या खोट्या जबाबावरुन पोलीस उपनिरीक्षक धाकराव यांच्यावर झालेली कारवाई मागे घ्यावी
मोक्का मधील आरोपींच्या मुसक्या आवळल्याचा राग धरुन आरोपींनी जबाब दिल्याचा आरोप
मोक्का मधील गुन्हेगारांना अटक केल्याप्रकरणी त्याचा राग मनात धरुन आरोपींनी खोट्या जबाबाला राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे सहकारी बळी पडले असून, याप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईचा फेरविचार करण्याच्या मागणीसाठी चर्मकार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे, प्रदेश संघटक नंदकुमार गायकवाड, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोहकरे, अभिजित खरात, बाळकृष्ण जगताप, बापूसाहेब देवरे, महिला जिल्हाध्यक्षा मीनाताई गायकवाड, गीता कांबळे, अभिजीत शिंदे, विठ्ठल जयकर, पोपट बोरुडे, विद्या वाघ, वंदना गायकवाड, नलिनी लोहकरे, क्रांती गायकवाड, कारभारी चिंधे आदी उपस्थित होते.
राहुरी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांनी राहुरी तालुक्यातील गंभीर गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. त्यांच्या कारवाईमुळे राहुरी तालुक्यातील गुन्हेगारीला चाप बसला असून, जनतेने मोकळा श्वास घेतला आहे. त्यांनी सहा महिन्याच्या कार्यकाळात भांड टोळीवर मोक्का लावून गुन्हेगारांवर कायद्याचा आणि पोलिस प्रशासनाचा धाक निर्माण केला. त्यांच्याच टोळीतील काही सराईत गुन्हेगारांवर त्यांनी गुहा येथे झडप घालून जेरबंद केले होते. या कारवाईत गुन्हेगारांशी झटापट झाल्याने ते गंभीर जखमी देखील झाले होते. त्याचा राग धरून एका आरोपीच्या जबाबावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला.
खाकीचा दरारा निर्माण करणार्या अधिकार्यांवर चुकीच्या पध्दतीने कारवाई होत असल्याने त्यांना आपले व्यवस्थितपणे कर्तव्य बजावण्यास अडचण निर्माण होत आहे. यामुळे गुन्हेगारांचे फावते आहे. अशा कारवाईने गुन्हेगारी प्रवृत्तीला मोकळीक देण्यासारखे आहे. 17 डिसेंबर 2021 रोजी राहुरी कारागृहाच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज कापून मोक्का गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुन्हेगार व टोळी प्रमुख सागर अण्णासाहेब भांड, किरण अर्जुन आजबे, सोन्याबापू मछिंद्र माळी, रवी पोपट लोंढे, जालिंदर मछिंद्र सगळगिळे पसार झाले होते. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक धाकराव यांच्या पथकाने तीन आरोपीच्या राहुरी न्यायालयाच्या पाठीमागे पाठलाग करून मुसक्या आवळल्या. सदर गुन्हेगारांनी हा राग मनात धरुन धाकराव यांच्या विरोधात जबाब दिला आहे. याप्रकरणी फेर चौकशी करुन सत्य बाहेर आनावे. पोलीस उपनिरीक्षक धाकराव व त्यांच्या सहकारींवर केलेली कारवाई मागे घेण्याची मागणी चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.