आष्टी ते नगर 61 किमी ट्रॅक वर पहिल्यांदाच धावली बारा डब्यांची हाय स्पीड रेल्वे…

बहुप्रतिक्षीत अहमदनगर – बीड – परळी रेल्वे मार्गावरील 67 कि.मी. पर्यंतचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावर बुधवारी अहमदनगर ते आष्टीपर्यंत 61 किमी ट्रॅक वर हायस्पीड ट्रायल घेण्यात आली . पहिल्यांदाच बारा डब्यांची हाय स्पीड रेल्वे बीड जिल्हय़ात धावल्या मूळे जिल्हावासियांकडून आनंद व्यक्त होत आहे . या ट्रायलवेळी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते .

 बीड  जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अहमदनगर – बीड – परळी  मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले होते . या परिस्थितीत गेल्या दोन वर्षापासून या रेल्वे मार्गावर कामाने वेग घेतला . यामुळे आष्टी पर्यंतचे रेल्वेचे कामे पूर्ण झाले आहे . एकूण 61 किलोमीटर अंतराचा असलेला हा टप्पा पूर्ण झाला असून या मार्गावर सोलापूरवाडी हे स्टेशन तयार करण्यात आले आहे . येथून दक्षिण रेल्वेचे मुख्य अधिकारी मनोज अरोरा यांच्या हस्ते या स्टेशनवर पूजा करण्यात आली . त्यानंतर या संपूर्ण 61 किमी अंतराच्या तपासणीस सुरुवात झाली . यासाठीची मोठी रेल्वे या रुळावर धावली . अधिकारी संपूर्ण रुळाची , पुलांची आणि सर्वांची पाहणी केल्यानंतर आष्टी येथून या हायस्पीड ट्रायलला सुरुवात झाली .
 अहमदनगर – बीड – परळी रेल्वे मार्ग 261 किलोमीटरचा असून गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न रखडला होता . रेल्वेमुळे औद्योगिक वसाहती निर्माण होण्यात मोठ्या अडचणी होत्या . शिवाय बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या . सन 1995 साली या नगर बीड परळी रेल्वे मार्गला तत्वतः मंजुरी मिळाली होती . मात्र त्यानंतर अनेक वर्ष राजकीय इच्छाशक्ती अभावी या मार्गाचे काम रखडले होते . दरम्यान , स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी रेल्वे मार्गासाठी भरभरून योगदान देत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या मार्गासाठी भरीव निधीची तरतूद केली . याकामात राज्य सरकारचा तेवढाच वाटा आहे . नुकताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही राज्य सरकारकडून मोठा निधी या मार्गासाठी मंजूर केला .
सद्यस्थितीत हा प्रकल्प तीन हजार कोटीच्या पुढील असून नगर ते आष्टी साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली असताना मागील महिन्यात धावणारी रेल्वे तांत्रिक अडचणीमुळे धावली नव्हती . पण बुधवारी सकाळी अहमदनगरवरून आष्टीच्या दिशेने हि रेल्वे धावली . त्यामुळे बीड जिल्हावासियांना गेल्या अनेक वर्षापासूनचे रेल्वेचे स्वप्न होते ते अखेर पूर्णत्वाकडे जात असल्याचे पाहावयास मिळाले . सोलापूरवाडी , कडा , आष्टी या ठिकाणीहून रेल्वे  धावल्यामुळे रेल्वे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती .