उड्डाणपूलांसह निवासस्थानांना मंजुरी
राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती: सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक
जिल्ह्यातील नगर-मनमाड रस्त्यावरील डीएसपी चौक व एमआयडीसी येथे दोन उड्डाणपूल तथा भुयारी मार्ग बांधण्याच्या कामासह शासकीय निवासस्थाने तसेच शेवगाव येथे बाह्य वळण रस्ता ‘ बांधा, वापरा आणि हस्तांतर करा’ या तत्त्वावर विकसित करण्यासाठी तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या विकास कामांच्या बाबत मंगळवारी मुंबई या ठिकाणी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील, रस्ते विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यातील सध्याची स्थिती लक्षात घेता येत्या काळात वाहतुकीचा सुनियोजन करण्याच्या दृष्टीने अहमदनगर-मनमाड रस्ता कामाच्या मंजूर निधीतून डीएसपी चौक आणि एमआयडीसी असे दोन उड्डाणपूल तथा भुयारी मार्ग बांधणे आणि शेवगाव या ठिकाणी बाह्य वळण रस्त्याचे काम करून तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील डीएसपी चौक या ठिकाणी शासकीय निवासस्थाने बांधा ,वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर विकसित करण्याबाबतचे एक सादरीकरणही या बैठकीत करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबतच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत सदर विकास कामांना तत्वतः मंजुरी दिली असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली आहे. या मागणीमुळे नगर जिल्ह्यातील रस्ते वाहतुकीचे योग्य नियोजन होऊन जनतेला वाहतुकीसाठी अतिशय चांगले आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध होणार आहेत. असेही विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.