कोट्यावधी रुपये खर्च करुन झालेल्या महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अहमदनगर कार्यालयांतर्गत एन.एच. 61 महामार्गाची मोठी दुरावस्था झाली असून, अनेकांचे अपघात होऊन बळी जात असताना त्वरीत रस्ता दुरुस्तीचे कामे मार्गी लावावे व या रस्त्याच्या निकृष्ट कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी भाजप कामगार आघाडीचे पारनेर तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा सोमवार दि.10 जानेवारी पासून शहरातील सहकार सभागृह येथील उपप्रबंधक तांत्रिक प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अहमदनगर कार्यालयांतर्गत माळशेज घाट एन.एच. 61 या रस्त्यावर 101 ते 211 किलोमीटर आंतर करिता कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात आला होता. ऑगस्ट 2014 साली या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. या महामार्गाची काही वर्षातच मोठी दुरवस्था झाली असून, अद्यापही दुतर्फा साईड पट्ट्या, मुरूम फिलिंगचे काम झालेले नाही. महामार्गाच्या दुतर्फा लावलेल्या झाडांना दोन वर्षापासून पुरेशे पाणी न मिळाल्याने त्यांची वाढ झाली नसून, काही झाडे जळाली आहेत. भाळवणी गाव ते ढवळपुरी फाटा या अंतरावर 50 ते 60 लोकांची अपघाती मृत्यू झाले आहे. हा परिसर मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्टीवर मुरूम टाकलेला नसल्याने अनेक लहान-मोठे अपघात होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
4 नोव्हेंबर 2020 रोजी सदर प्रश्नांसाठी रास्ता रोकोचा इशारा दिला होता. विनंती पत्रावरून रास्तारोको स्थगित करण्यात आले. परंतु अद्याप कामाची पूर्तता करण्यात आलेली नाही. महामार्गावरील लहान-मोठे पूला खाली व शेजारी वाढलेले गवत, झाडे झुडपांमुळे तसेच महामार्गाच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमण वाहतुकीस अडथळा होत आहे. या महामार्गाच्या कामात अनियमितता असून, निष्काळजीपणामुळे अनेकांचा जीव गेलेला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर रस्त्याच्या कामात झालेला भ्रष्टाचार उघडकीस आनण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, त्वरित सदर रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्टयांवर मुरुम टाकण्यात यावे, बस स्टॅन्ड पेंटिंगचे काम करुन कापरी चौकात हायमॅक्स बसवावा, रस्त्यावरील प्रलंबीत कामे मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.