चर्मकार संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब लोहकरे यांची नियुक्ती
चर्मकार संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक बाबासाहेब शंकरराव लोहकरे (अण्णा) यांची नियुक्ती करण्यात आली. समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांनी लोहकरे यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब लोहकरे (अण्णा) मागील पंचवीस वर्षापासून चर्मकार समाजात योगदान देत आहेत. ते जिल्ह्यातील लेदर व रेक्झीनचे व्यापारी असून, समाजात वधू-वर मेळावे, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, गरीब मुलींचे लग्न लाऊन देणे, दुर्बल घटकांना आधार देण्याचे कार्य सातत्याने करीत आहे. तसेच वृक्षरोपण व रक्तदान शिबीराच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक उपक्रम राबविले आहेत. समाजाप्रती काम करण्याची असलेली तळमळ पाहता त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे शिवाजी साळवे यांनी सांगितले.
बाबासाहेब लोहकरे (अण्णा) यांनी चर्मकार समाजाला एकत्र करुन दिशा देण्याचे कार्य चर्मकार संघर्ष समितीच्या माध्यमातून केले जात आहे. समाज एकत्र आल्यास विकास साधला जाणार आहे. या समितीच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी कार्य केले जाणार आहे. चर्मकार समाजातील युवकांची बेरोजगारी व इतर प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल बापूसाहेब देवरे, नंदकुमार गायकवाड, विठ्ठल जयकर, सुभाष भागवत, अभिजीत खरात, पोपट बोरुडे, आश्रू लोकरे, मिनाताई गायकवाड आदींनी अभिनंदन केले.