दुर्गम भाग असलेल्या रेडे गावातील आदिवासी समाजबांधव शासकीय योजनांपासून वंचित शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची मागणी
अकोले तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या रेडे गावातील आदिवासी समाजबांधव शासकीय योजनांपासून वंचित असून, जिल्हा प्रशासनाने त्यांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना सदर योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या मागणीचे निवेदन अहमदनगर जिल्हा भिल्ल असोसिएशनच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी भिल्ल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल ठाकरे, सचिव दैवान फुलपगारे, राहुरी तालुकाध्यक्ष किरण माळी, तुकाराम माळी, बहुजन क्रांती मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष गणेश चव्हाण, सुरज गोहेर आदी उपस्थित होते.
अकोले तालुक्यातील रेडे या गावात अनेक आदिवासी समाजबांधव अशिक्षित असल्याने अनेक शासकीय योजनेपासून ते वंचित आहे. अनेक कुटुंबातील व्यक्तींचे रेशनकार्ड मध्ये नांव नाही, तर आधारकार्ड देखील नाहीत. काही व्यक्तीचे रेशन कार्ड आहे, पण ते अंत्योदय यादीत नाही. अनेक वर्षापासून घरपट्टी भरून सुद्धा त्यांचे सातबारा उतारावर नांवे नाहीत. निराधार वयस्कर व्यक्ती गावात असून, त्यांना कुठलाही लाभ मिळत नाही. आदिवासी कुटुंबीयांना घरकुलाचे लाभ मिळण्यास देखील अनेक अडचणी येत आहेत. आदिवासी खावटी योजनेपासून देखील ते वंचित आहेत. काही व्यक्तींना घरकुल मंजूर आहे, पण जागा उपलब्ध करून दिली जात नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. अनेक आदिवासी बांधव योजनेस पात्र असून देखील त्यांना शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. तरी जिल्हा प्रशासनाने योग्य कार्यवाही करुन दुर्गम भाग असलेल्या रेडे गावातील आदिवासी समाजबांधव शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची मागणी अहमदनगर जिल्हा भिल्ल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर गावातील आदिवासी कुटुंबीयांचे नावे आहेत.