नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघात रंगल्या तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा
भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेस तालुक्यातील संघांचा उत्सफुर्त सहभाग लाभला होता. देहरे (ता. नगर) संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजेतेपद पटकाविले.
या हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ ज्येष्ठ शिक्षक काशीनाथ पळसकर यांच्या हस्ते झाला. दिवसभर हॉलीबॉल स्पर्धेचे सामने रंगले होते. सामने पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी गर्दी केली होती. अंतिम सामना नवनाथ ग्रुप निमगाव वाघा विरुध्द देहरे संघात अत्यंत अटीतटीचा झाला. देहरे संघाने 25 व नवनाथ ग्रुपने 21 गुणाची कमाई केली करुन देहरे संघाने चार गुणांनी नवनाथ ग्रुप संघावर विजय मिळवला. विजयी झालेला देहरे संघ जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेत उपविजयी नवनाथ ग्रुप तर तृतीय जय मल्हार संघ ठरला. पंच म्हणून अल्फेज शेख व निखील कपाळे यांनी काम पाहिले.
बक्षिस वितरण कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक किसन वाबळे, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, निळकंठ वाघमारे, दत्तात्रय जाधव, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे आदींसह खेळाडू, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे यांनी खेळाद्वारे युवक सदृढ होऊन राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरित होणार आहे. ग्रामीण भागातील युवकांना पारंपारिक मैदानी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. काशीनाथ पळसकर यांनी विजयी संघास शुभेच्छा देऊन इतर संघांना पुन्हा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजयी व उपविजयी संघास चषक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप डोंगरे यांनी केले. आभार चंद्रकांत पवार यांनी मानले. या स्पर्धेसाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.