प्रसिध्द चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा पुणे विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार
नगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 73 व्या वर्धापनदिना निमित्त नगरमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांना विद्यापीठातर्फे जीवन साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रमोद कांबळे यांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे उपस्थित होते.
प्रमोद कांबळे यांनी आपल्या कला सेवेतून अनेक अजरामर कलाकृती साकारल्या आहेत. जीवनात अनेक चढउतार अनुभवताना त्यांनी आपली कलेवरील निष्ठा तसूभरही ढळू दिली नाही. भारतरत्न नानाजी देशमुख, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम, पंडित भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्या सारख्या अनेक दिग्गजांनी कांबळे यांच्या कलेचा गौरव केला आहे. कलाक्षेत्रात त्यांचे काम देश विदेशात नावाजले जाते. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी सुरु केलेली मातीचे गणपती बनवा ही चळवळ गेल्या दोन दशकांत राज्यात तसेच देशात सर्वदूर पसरली आहे. काही वर्षांपूर्वी नगर येथील त्यांचा प्रचंड मोठा स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्यानंतर फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेऊन प्रमोद कांबळे यांनी स्टुडिओ पूर्वपदावर आणत विविध शिल्पे आकारले आहेत. विद्यार्थ्यांना, समाजाला कलासाक्षर बनविण्यासाठी ते देशभरात विविध ठिकाणी कार्यशाळा घेतात. नुकतीच त्यांनी अयोध्या कलामहोत्सवातही प्रमुख कला मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली.
या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना प्रमोद कांबळे म्हणाले की, कलाकाराने नेहमीच नाविन्याचा ध्यास घेतला पाहिजे व आपली निष्ठा कलेप्रती असली पाहिजे. गुरुजन, वडिलांची हिच शिकवण अंमलात आणत या क्षेत्रात योगदान देत आहे. देशात प्रतिष्ठित असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेला सन्मान माझ्यासाठी कायम अनमोल ठेवा राहिल.