वंचितांचे नेत्रदूत म्हणून फिनिक्स फाऊंडेशनचे योगदान -शिरीष मोडक
फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने जागतिक मानवहक्क दिनानिमित्त मोफत नेत्र, आरोग्य तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर
फिनिक्स फाऊंडेशनने कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार दिला. समाजाची गरज ओळखून सातत्याने फाऊंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे रुग्णसेवा करीत असून, दृष्टीदोष असलेल्या लाखो गरजू घटकांवर त्यांनी मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया घडवून आनल्या आहेत. वंचितांचे नेत्रदूत म्हणून फिनिक्स फाऊंडेशन योगदान देत असून, शेवटच्या घटकांना याचा लाभ मिळत असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष शिरीष मोडक यांनी केले.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे जागतिक मानवहक्क दिनानिमित्त मोफत नेत्र, आरोग्य तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी मोडक बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मसापचे अध्यक्ष किशोर मरकड, पुणे मसापचे केंद्रीय सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, वैभव दानवे, राजेंद्र बोरुडे, उद्योजक महेश झोडगे, सागर निमसे, डॉ. विशाल घंगाळे, सचिन जाधव आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फाऊंडेशन दृष्टीदोष असलेल्या वंचित घटकातील रुग्णांची मागील 26 वर्षापासून सेवा करीत आहे. अनेक गरजू रुग्णांना आधार देण्याचे कार्य सुरु असून, नेत्रदान व अवयवदान चळवळीत देखील योगदान देण्यात आले आहे. अनेक दृष्टीहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या अध्यक्षपदी मोडक यांची तर मसापच्या अध्यक्षपदी मरकड व पुणे मसापच्या केंद्रीय सदस्यपदी पालवे यांची निवड झाल्याबद्दल फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
चंद्रकांत पालवे म्हणाले की, आपल्या आईच्या प्रेरणेने जालिंदर बोरुडे यांनी आरोग्य सेवेचे महायज्ञ अविरतपणे सुरु ठेवले आहे. समाजात निस्वार्थ भावनेने काम करण्याची दानत असावी लागते. या दातृत्वच्या भावनेने व कोणत्याही प्रकारचा समाजसेवेचा बडेजावपणा न करता बोरुडे यांची सेवा सुरु असून, कोणत्याशी प्रकारचे अनुदान न घेता स्वखर्चाने करत असलेलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किशोर मरकड यांनी ग्रामीण भागातील अनेक दृष्टीदोष असलेल्या गरजूंसाठी फिनिक्स फाऊंडेशन दीपस्तंभ ठरला. अनेकांना या चळवळीच्या माध्यमातून नवदृष्टी मिळून अंधकारमय जीवन उजळले. महागडी उपचार पध्दती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरची गोष्ट असून, फाऊंडेशन देत असलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात 373 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. 93 गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच यावेळी शिबीरार्थींची कोरोना आरटीपीसीआर चाचणी व लसीकरण करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांचे मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात आली. शिबीरार्थींना अल्पदरात नंबरचे चष्मे उपलब्ध करुन देण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव दानवे यांनी केले. आभार राजेंद्र बोरुडे यांनी मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी विशाल गायके, सौरभ बोरुडे, गौरव बोरुडे, विशाल गायके, ओम बोरुडे यांनी परिश्रम घेतले.