व्यापाऱ्यांची फसवणूक करण्याचा धंदा कधी थांबवणार ? किरण काळेंचा बाजार समिती सत्ताधाऱ्यांना सवाल
शहर जिल्हा काँग्रेसचा तालुका महाविकास आघाडीच्या भूमिकेला पाठिंबा
जुन्या अनधिकृत बांधकामांचा वाद अजून मिटलेला नाही. बाजार समितीने जुन्या गाळेधारक व्यापाऱ्यांवर अन्याय केलेला आहे. त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. ते प्रकरण अजून मिटलेले नसताना देखील बाजार समिती आवारामध्ये सत्ताधाऱ्यांनी व्यापाऱ्यांची फसवणूक करून पुन्हा नव्याने अनधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरू केली आहेत. यांनी मुताऱ्यांची सुद्धा जागा सोडलेली नाही. व्यापाऱ्यांची फसवणूक करण्याचा हा धंदा तुम्ही कधी थांबणार ? असा संतप्त सवाल शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी बाजार समिती सत्ताधाऱ्यांना केला आहे.
नगर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने बाजार समिती आवारामध्ये आज सकाळपासून आंदोलन सुरू झालेले आहे. या मध्ये शिवसेनेचे संदेश कार्ले, शरद झोडगे, काँग्रेसचे बाळासाहेब हराळ, रामदास भोर यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते सहभागी झाले आहेत. या आंदोलनाला किरण काळे यांनी शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह भेट देऊन महाविकास आघाडीच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला. त्यावेळी काळे बोलत होते.
काळे म्हणाले की, बाजार समिती सत्ताधार्यांना मस्ती चढली आहे. ते व्यापाऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक करत आहेत. व्यापाऱ्यांनी या लबाड लांडग्यां पासून सावध झाले पाहिजे. आजच्या तात्पुरत्या प्रलोभनाला बळी पडून भविष्यातला आर्थिक, व्यावसायिक तोटा यामुळे व्यापाऱ्यांचा होणार आहे. तात्पुरत्या फायद्यापेक्षा भविष्यातील नुकसान हे मोठ असणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या आमिषाला बळी पडू नये. व्यापारी बांधवांनी नियमात राहून बांधकामे असलेल्या ठिकाणीच बाजार समिती बरोबर व्यवहार करावा. व्यापाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या बाजार समितीच्या विरोधात आमची भूमिका असून व्यापाऱ्यांना संपूर्ण संरक्षण देण्याचे काम शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने केले जाईल, असे यावेळी काळे म्हणाले.
व्यापाऱ्यांची ही फसवणूक हे सत्ताधारी आणि त्यांचे नेते वैयक्तिक स्वार्थासाठी करत आहेत. व्यापाऱ्यांवर यांचा मोठा दबाव आहे. मात्र येणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्तांतर निश्चित होणार असून या माध्यमातून शहरातील व्यापारी व तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम निश्चितपणे होईल असा मला विश्वास आहे. या लढाईमध्ये शहर जिल्हा काँग्रेस देखील नगर तालुका महाविकास आघाडीच्या बरोबर असून नगर शहरातील व्यापाऱ्यांवर कुठल्या ही परिस्थितीत अन्याय होणार नाही यासाठी काँग्रेस व्यापाऱ्यांच्या ठामपणे पाठीशी असल्याची भूमिका यावेळी काळे यांनी आंदोलनस्थळी जाहीर केले.
२८ अनधिकृत गाळ्यांचा प्रश्न अजून प्रलंबित आहे. या बाबतीमध्ये बाजार समिती प्रशासनाला वारंवार आदेश होऊन देखील त्यांनी सुधारणा केलेली नाही. महानगरपालिकेत “या” सोयाऱ्या – धायऱ्यांची सत्ता आहे. न्यायालयाचा आदेश असताना देखील मनपा प्रशासन हातावर हात धरुन कुणाच्या दबावामुळे बसले आहे ? मनपातील सत्तेचा गैरवापर बाजार समिती आवारातील व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी आणि त्यांची दिशाभूल करण्यासाठी ते जाणीवपूर्वक करत आहेत. ज्यांनी व्यापाऱ्यांवर विष घ्यायची वेळ आणली तेच आम्ही व्यापाऱ्यांचे कैवारी असल्याचा खोटा दिखावा करत आहेत, असा आरोप देखील यावेळी किरण काळे यांनी सत्ताधारी आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या सोयाऱ्या – धायऱ्यां वर नाव न घेता केला.
यावेळी काळे यांच्या समवेत माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील,नगर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, तालुका काँग्रेसचे नेते शंकरराव साठे, काँग्रेसचे शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, युवा नेते सुरज साठे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.