शिवजयंती दिनी काळीआई शिवाररस्ता मुक्ती संग्राम अभियानाला होणार प्रारंभ
शेतकर्यांना शेत रस्ते मोकळे करुन देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार
जिल्ह्यासह राज्यात शेतकर्यांना शेत रस्त्यांअभावी जमिनी पड ठेवणे भाग पडत आहे. यासाठी पीपल्स हेल्पलाईनने काळीआई शिवाररस्ता मुक्ती संग्रामची घोषणा केली आहे. या अभियानाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी होणार असून, या अभियानाच्या अस्थायी समिती अध्यक्षपदी राशिनचे ज्ञानदेव काळे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
महाराष्ट्र लॅण्ड रेव्हेन्यू कोड 1966 चे कलम 143 खाली गावोगाव शेतकर्यांना शेत रस्ते उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. परंतु भ्रष्टाचारात गुंतलेल्या राज्यातील अनेक तहसीलदार शेतकर्यांना न्याय देण्यामध्ये कमी पडले आहे. राज्यात हजारो शेतकर्यांनी आपल्या शेतजमिनी शेत रस्त्या अभावी पड ठेवल्या आहेत. धनदांडगे लोक दुबळे शेतकर्यांचा रस्ता अडवून त्यांच्या जमिनी हडप करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा वेळेस महसूल आणि पोलिस खात्याची मदत शेतकर्यांना होत नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
पीपल्स हेल्पलाइनने राज्यात काळीआई शिवाररस्ता मुक्ती संग्राम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच झालेल्या संघटनेच्या बैठकीत यासाठी अस्थायी समिती नेमण्यात आली असून, समितीच्या अध्यक्षपदी राशिनचे ज्ञानदेव काळे, उपाध्यक्षपदी आशाबाई शिंदे यांची तर सखाराम सरक, अशोक सब्बन, अॅड. कारभारी गवळी, आदिनाथ कुसमुडे, प्रकाश थोरात, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
शेत रस्ता ग्रस्त शेतकर्यांच्या तक्रारी तातडीने प्रतिसाद देऊन, आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यांचा प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून सोडविण्याची जबाबदारी स्विकारण्यात आली आहे. महसूल खात्याच्या अधिकार्यांवर दबाव निर्माण केल्याशिवाय शेतकर्यांना न्याय मिळणार नाही आणि महसूल खात्याची न्याय विक्री बंद होणार नाही. शेतकर्यांच्या शिवार रस्त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी काळीआई शिवाररस्ता मुक्ती संग्रामशिवाय पर्याय नसल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. प्रत्येक गावाच्या समविचारी गावकर्यांचा पाठिंबा घेऊन आणि गावातील सरपंच, उपसरपंच यांचा सक्रिय सहभाग घेऊन शेतरस्ते उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पाथर्डी तालुक्यातील मौजे शंकरवाडी येथील गट नंबर 187 चे दक्षिणेच्या बांधावरील शेत रस्ता एका धनदांडग्या व्यक्तीने कारण नसताना अडविला आहे. यामुळे गट नंबर 171 ते 175 या जमीन मालकांना रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काळीआई शिवाररस्ता मुक्ती संग्रामच्या माध्यमातून हा शेत रस्ता खुला करुन देण्यासाठी पाथर्डीपासून या आंदोलनाची सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.