सरकारी कामात अडथळा ; दुकानदाराला शिक्षा
नगर : सरकारी कामात ग्रामसेविकेला शिवीगाळ अडथळा आणून महिला करणाऱ्या दुकानदाराला दोषी ठरवून कोर्टाने शिक्षा सुनावली . याच खटल्यात फितूर झालेल्या साक्षीदार व सरपंचास न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे . प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश एस . व्हि . यार्लगड्डा यांनी हा निकाल दिला . या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले . शिवाजी उर्फ अमोल पंढरीनाथ शिंदे ( रा . नगर पाथर्डी रोड , बाराबाभळी शिवार माहेश्वरी किराणा दुकान ता . जि . नगर ) असे आरोपीचे नाव आहे . न्यायालयाने त्याला दोषी धरून ५ हजार रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम फिर्यादीला देण्याचा आदेश केला . तसेच एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर सोडले . मात्र या खटल्यातील फितुर साक्षीदार माणिक केरू वागरकर ( सरपंच , बाराबाभळी ग्रामपंचायत ) यांना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३४४ प्रमाणे फितुर घोषित करून कारणे दाखल नोटिस काढली . सप्टेंबर २०१८ मध्ये दुकानदार शिंदे याने ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन व्यवसाय दाखल्याची मागणी करत हुज्जत घातली होती . त्यावेळी सरपंच , सदस्य व नागरिकानी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला . पण त्याने त्यांनाही अरेरावीची भाषा केली . त्यामुळे याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली होती . या खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने ५ साक्षीदार तपासण्यात आले . न्यायालयासमोर आलेला पुरावा , साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा ठोठावली . या खटल्यात सहायक फौजदार लक्ष्मण काशिद व हेड कॉन्स्टेबल पी . ए . पाटील यांनी सहकार्य केले .