सरकारी तिजोरीवर डल्ला मारणार्या पुढार्यांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने इच वन, टीच डिच्चू कावा मोहीम जारी
चांगले काम करणार्या व्यक्तींची समाज दखल घेत असून, चांगल्या व्यक्तींनी राजकारणात यावे व नागरिकांनी देखील अशा उमेदवारांना निवडून द्यावे. तर सरकारी तिजोरीवर डल्ला मारणार्या पुढार्यांना लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेपासून लांब ठेवण्यासाठी जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्र अवलंब करण्याचे आवाहन पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आले आहे. तर या मोहिमेच्या जनजागृतीसाठी पीपल्स हेल्पलाईनने शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने इच वन, टीच डिच्चू कावा मोहीम जारी करण्यात आली आहे.
साडेतीनशे वर्षे होऊनही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर जनतेमध्ये टिकून असून, तो वाढत आहे. याचा अर्थ काम करणार्यांना लोक उचलून धरतात. ही बाब सूर्यप्रकाशाइतकी लख्ख आहे. मतदारांना पैसे दिल्याशिवाय ते मतं देत नाही आणि निवडून देत नाही, ही सर्व अफवा आहे. लोकशाहीमध्ये चांगल्या लोकांना लोक मत देत नाहीत, निवडून देत नाही असा कांगावा लोकशाहीला घातक आहे. चांगल्या माणसाला राजकारणात वाव नाही असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले आई-वडील, नातेवाईक, शेजारीपाजारी यांना जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्र शिकवण्याचा आग्रह संघटनेने धरला आहे.
मतसत्ताक कावेबाजी प्रत्येक मतदारांमध्ये निर्माण करण्यासाठी इच वन, टीच डिच्चू कावा या मोहिमेला महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात धनदांडग्यांनी मतदारांविरुद्ध कावेबाजी केली आणि त्यांच्या खिशात हजार पाचशे रुपये टाकून त्याला मिंधे केले. पुढील पाच वर्षे कोणतेही कामे न करता मतदारांना दारात देखील उभे केले नाही. त्यामुळे झोपडपट्टाया, बेकरी, व गुन्हेगारी वाढली. परंतु स्वातंत्र्याची फळे सामान्य जनतेला मिळाली नाहीत. याचा दोष लोकशाहीमधील आदर्शाचा अभाव आणि जनता जागृक नसल्यामुळे झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आदर्श राज्य निर्माण केले. त्यांचा आदर्श समोर ठेऊन मागच्या दाराने सत्ता मिळवणारे भ्रष्टाचारी, जातीमंडूक आणि धर्मवेड्यांना कायमचे दूर करण्यासाठी डिच्चू कावा शिवाय पर्याय नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
18 वर्षाच्या मुलाला मतदानाचा तर 21 वर्षाच्या युवकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार प्राप्त होत असून, लहान विद्यार्थ्यांमध्ये डिच्चू कावाप्रती जागृती करण्यासाठी संघटनेच्या मोहिम सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर डल्ला मारुन देशाशी गद्दारी करणार्या समाजकंटकांना यापुढे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अजिबात निवडून देता कामा नये. यासाठी जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्र अवलंबून काम करणार्या उमेदवाराला आवर्जून निवडून द्यावे. ज्याप्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळात क्रांती घडवून इंग्रजांची सत्ता भारतीयांनी काढून घेतली. त्याच प्रकारे डिच्चू काव्याने भ्रष्ट पुढार्यांना सत्तेतून पाय उतार करण्यासाठी चळवळ चालवली जाणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या मोहिमेसाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, जालिंदर बोरुडे, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.