बांधकाम कामगारांची पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी पूर्ववत सुरु करा
महाराष्ट्रातील 54 लाख बांधकाम कामगार नोंदणीपासून वंचित
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे 21 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण
नगर (प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे व संघटनांच्या वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यानंतरही बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी ऑनलाईन पोर्टल पूर्ववत सुरु होत नसल्याने महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या वतीने 21 जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कृती समितीचे निमंत्रक शंकर पुजारी, सहनिमंत्रक सागर तायडे व विनिता बाळेकुंदरी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या उपोषणास जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा निमंत्रक शंकरराव भैलुमे यांनी केले आहे.
सध्या महाराष्ट्र मध्ये इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 28 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. इतकेच नव्हे तर 26 लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत. बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी असलेले ऑनलाईन पोर्टल बंद पडल्याने, एकूण 54 लाख बांधकाम कामगारांचे काम सध्या पूर्णपणे बंद पडल्याच्या अवस्थेत आहे.
या मंडळाचे सचिवांनी कारस्थान करून आचारसंहिता सुरू आहे, म्हणून काम करता येणार नाही! असे सांगून सर्व कामकाज बंद पाडल्याचा आरोप कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे. आचारसंहिता व या नोंदणीचा काही संबंध नसताना पोर्टल बंद करण्यात आले. याविरोधात कामगार संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल केली होती. याबाबत 6 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने एका दिवसात पूर्वी प्रमाणे सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचे आदेश दिले आहे. परंतु जाणीवपूर्वक बड्या कंत्राटदारांचे भले करण्यासाठी लाखो कामगारांना सगळ्या लाभांपासून वंचित ठेवण्यासाठी या मंडळाचे सचिव यांनी तालुका पातळीवर ऑनलाईनचे काम करण्यात येईल असे घोषित करून, प्रत्यक्षामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाची पायमल्ली केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या अन्यायाविरुद्ध नागपूर विधानसभेवर 18 डिसेंबर रोजी बांधकाम कामगारांनी मोर्चा काढला. त्यानंतर 2 जानेवारी रोजी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी बांधकाम कामगारांचे पोर्टल पूर्वत पूर्व करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात पोर्टल सुरू न झाल्याने बांधकाम कामगारांमध्ये असंतोष पसरलेला आहे. बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी तालुका कामगार सेवा केंद्र पूर्णपणे कुचकामी ठरत आहे. त्या ठिकाणी कामगारांचे शोषण सुरु असून, 21 जानेवारी पर्यंत पोर्टल सुरु न झाल्यास राज्यातील सर्व बांधकाम कामगार मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणास बसणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
या उपोषणासाठी शंकरराव भैलुमे (अहिल्यानगर), नागेश बनसोडे (सोलापूर), सागर कुंभार (सातारा), मंगेश माटे (भंडारा), सुनील लाखे (नाशिक), वाहिद पठाण (संभाजीनगर), संदीप भंडारे (अकोला), अजय कांबळे (लातूर), नितीन यादव (सातारा) आदी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक प्रयत्नशील आहेत.