आयपीएल : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामासाठी संघांच्या सराव सत्रांबाबत कठोर नियम लागू केले. पूर्वी संघांना सरावासाठी मोकळीक देण्यात येत होती, परंतु आता त्यांना जास्तीत जास्त ७ सत्रेच मिळतील. यासोबतच फक्त २ सराव सामने किंवा मुख्य खेळपट्टीवर सराव सत्रांना परवानगी आहे. बीसीसीआयने फ्रँचायझींना पाठवलेल्या पत्रात नवीन नियमांची स्पष्ट रूपरेषा दिली. हे नियम आयपीएल केंद्रांना दिलेल्या अलीकडच्या सूचनांशी सुसंगत आहेत, ज्यामध्ये स्थानिक खेळ, लिजेंड्स लीग किंवा सेलिब्रिटी स्पर्धांसाठी मैदानांचा वापर करू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयला लीगसाठी मैदाने आणि खेळपट्ट्या सर्वोत्तम स्थितीत हव्या आहेत.
पत्रानुसार, हे नवीन नियम देशांतर्गत सामन्यांदरम्यान मैदानांवरील अतिरिक्त भार कमी करण्याच्या उद्देशाने आहेत. कारण हे सामने आयपीएल हंगामाच्या सुरुवातीला अधिक सामने खेळले जातात. यामुळे आयपीएलदरम्यान चांगल्या खेळपट्ट्या मिळतील, असा बीसीसीआयचा विश्वास आहे. पहिल्या सामन्यापूर्वी संघांना जास्तीत जास्त सात सराव सत्रे आयोजित करता येतील, जी तीन तासांपर्यंत चालू शकतात. यापैकी दोन सराव सामने किंवा ओपन नेट असू शकतात. सराव सामने मुख्य मैदानाजवळील एका खेळपट्टीवर खेळवले जातील. दोन संघ एकाच वेळी सराव करत असतील तर मंडळ हे प्रकरण हातांळेल, असेही बीसीसीआयने पाठवलेल्या आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.