अहमदनगर:
अहमदनगर महापालिकेचा रामभरोसे कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. नगरच्या महापालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये शहरातील सर्व महत्वाच्या नोंदी ठेवलेल्या असतात. परंतु गेल्या कित्येक दिवसापासून या कडे दुर्लक्ष केलं जातंय. या इमारतीमध्ये प्रामुख्याने नागरिकांच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी ठेवल्या जातात. इतके दिवस दुर्लक्षित असलेल्या या इमारतीमध्ये आज नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी अचानक भेट दिली आणि तिथला गलथान कारभार उघडकीस आला.
या ठिकाणी असलेल्या जुन्या जन्म मृत्यूच्या नोंदी असलेल्या रजिस्टर्स ची अवस्था अत्यंत दयनीय आहे. हे रजिस्टर्स उंदरांनी कुरतडून फाडून टाकले असल्यामुळे, महत्त्वाच्या नोंदी नष्ट झाल्यात.बरेच दिवस दुर्लक्षित असल्यामुळे या रजिस्टर्स मधून कुबट वास येत होता.
रजिस्टर मधल्या कागदपत्रांना ओलसर पणामुळे छिद्र पडले होते. या विषयी विचारणा केली असता महापालिका कर्मचाऱ्यांनी हात वर केलेत. ह्या विषयी जाब विचारण्यासाठी बोराटे महापालिका आयुक्तांच्या दालनात, आरोग्य अधिकरी आणि आयुक्तांची वाट पाहत बराच वेळ बसले होते. परंतु बोराटे यांच्या प्रश्नांना उत्तरे नाहीत म्हणून कि काय, महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी महापालिकेत येण्याचे टाळले.