जामखेड नगरपरिषदेत खळबळ! पाणीप्रश्नावर रोहित पवारांचा हंडा मोर्चा; मुख्याधिकारी साळवे पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी!

शहरातील तीव्र पाणीटंचाई, विस्कळीत पाणीपुरवठा आणि रखडलेली उजनी पाणीपुरवठा योजना या मुद्द्यां

 

नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणींचा पलटवार; ‘मोर्चापूर्वी पाणीटंचाईवरील उपाययोजनांची माहिती घ्या’

नासीर पठाण | जामखेड

जामखेड : शहरातील तीव्र पाणीटंचाई, विस्कळीत पाणीपुरवठा आणि रखडलेली उजनी पाणीपुरवठा योजना या मुद्द्यांवरून जामखेडचे राजकीय वातावरण तापले आहे. नागरिकांना बारा-बारा दिवसांनी पाणी मिळत असल्याने आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जामखेड नगरपरिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात येणार असून, नगरपरिषदेला टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी यांनी पत्रकार परिषद घेत, पाणीटंचाई दूर करण्यासाठी नगरपरिषदेने केलेल्या उपाययोजनांची माहिती आधी घ्यावी आणि त्यानंतरच मोर्चा काढावा, असा टोला आमदार रोहित पवार यांना लगावला. त्यामुळे पाणीप्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

पाणीप्रश्नावरून राजकीय संघर्ष पेटला!

जामखेड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि उजनी धरणावर आधारित रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेला गती द्यावी, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आठ दिवसांपूर्वी नगरपरिषदेला निवेदन दिले होते. तसेच नगरपरिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, अद्याप ठोस तोडगा निघाला नसल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे जामखेडच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

नगराध्यक्षांचा दावा; पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना सुरू

पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी यांनी सांगितले की, जामखेड शहरासह सात वाड्या-वस्त्यांमधील पाणीटंचाई कमी करण्यासाठी नगरपरिषदेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. भुतवडा तलावातील पाण्याची पातळी मृतसाठ्याखाली गेल्याने चारीमार्गे पाणी आणण्यासाठी पाच पाणबुडी वीजपंप सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय वाड्या-वस्त्यांवरील विहिरींचे खोलीकरण, आडवे बोअर घेणे, गाळ काढणे आणि गरजेनुसार विहिरींचे अधिग्रहण अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

तसेच, २८ ऑक्टोबर रोजी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा होणार असून, त्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबत ठराव घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या उपाययोजनांची माहिती घेतली असती, तर आमदार रोहित पवार यांनी हंडा मोर्चा काढण्याची भूमिका घेतली नसती, अशी उपरोधिक टीका चिंतामणी यांनी केली.

मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या कार्यपद्धतीवरूनही वाद निर्माण झाला आहे. ते मागील चार वर्षांपासून नगरपरिषदेत कार्यरत असून, त्यातील तीन वर्षे प्रशासक म्हणून काम पाहत होते. मात्र, शहर आणि वाड्या-वस्त्यांमधील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली नसल्याचा आरोप नगराध्यक्षांनी केला.

मागील दहा महिन्यांपासून सत्ताधारी नगरसेवकांना वेगवेगळी माहिती देऊन त्यांच्यात दुफळी निर्माण केल्याचा आरोपही साळवे यांच्यावर करण्यात आला. शहरातील सुमारे १८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आणि ७० कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत पुरेशी माहिती दिली जात नसल्याची तक्रारही करण्यात आली. संबंधित कामांबाबत विचारणा केल्यावर केवळ धनादेश देण्यापुरतीच भूमिका घेतली जात असल्याचा आरोप नगराध्यक्षांनी केला.

दुकानांना आग, अतिक्रमण आणि अस्वच्छतेचे प्रश्न ऐरणीवर

जामखेड शहरातील दोन दुकानांना लागलेल्या आगीत सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच शहरातील अस्वच्छता, अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेतील कथित दिरंगाई आणि भुतवडा तलावातून शेतीसाठी होत असलेल्या कथित अनधिकृत पाणीउपशाच्या मुद्द्यांवरूनही प्रशासनावर टीका होत आहे.

या सर्व प्रश्नांमुळे मुख्याधिकारी अजय साळवे यांची कार्यपद्धती चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. आता बुधवारी होणाऱ्या हंडा मोर्चात आमदार रोहित पवार मुख्याधिकाऱ्यांबाबत कोणती भूमिका मांडतात आणि पाणीटंचाईच्या प्रश्नावर नगरपरिषद काय भूमिका घेते, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.

या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, पाणीपुरवठा समितीचे सभापती श्रीराम डोके, नगरसेवक मोहन पवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.