महापालिका स्थायी समितीच्या ९ रिक्त जागेवर सदस्य नियुक्त
राष्ट्रवादी ४ , शिवसेना २ , भाजपा 2 तर काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश
नगर – महापालिकेतील स्थायी समितीचे ८ सदस्य १ फेब्रुवारीला निवृत्त झाल्याने त्यांच्याजागी पक्षीय कोठ्या नुसार नूतन सदस्यांच्या निवडी शुक्रवारी ( दि . ११ ) झालेल्या ऑनलाईन महासभेत महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी जाहीर केल्या आहेत . स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३ ऐवजी ४ सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या . तसेच शिवसेनेचे २ , भाजपचे २ तर काँग्रेसचा १ असे नूतन सदस्य आता स्थायी समितीत असणार आहेत .
स्थायी समितीच्या नूतन सदस्य निवडीसाठी महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन महासभेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी सभागृहात महापौर शेंडगे यांच्यासह उपमहापौर गणेश भोसले , आयुक्त शंकर गोरे , नगर सचिव एस . डी . तडवी उपस्थित होते . सभेत प्रारंभी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी दिलेला सभापती पदाचा व समिती सदस्य पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला . त्यानंतर स्थायी समितीच्या नवीन सदस्यांच्या नावाच्या गटनेत्यांनी केलेल्या शिफारशीनुसार निवडण्यात आलेल्या सदस्यांची नावे महापौर शेंडगे यांनी जाहीर केली .
राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी केलेल्या शिफारशीनुसार कुमारसिंह वाकळे , विनीत पाऊलबुधे , ज्योती गाडे , मिना चव्हाण यांची नावे जाहीर करण्यात आली . शिवसेनेच्या गटनेत्या स्वतः महापौर शेंडगे याच असल्याने त्यांनी गणेश कवडे व मंगल लोखंडे यांची नावे जाहीर केली . भाजपच्या गटनेत्या मालनताई ढोणे यांनी शिफारस केलेल्या राहुल कांबळे व गौरी नन्नावरे तसेच काँग्रेसच्या सुप्रिया जाधव यांनी शिफारस केलेल्या रुपाली निखील वारे या सदस्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली .
स्थायी समितीच्या नूतन सभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमारसिंह वाकळे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे . त्यामुळेच वर्षाचा कालावधी शिल्लक असतानाही सभापती अविनाश घुले यांनी सभापती पदासह समिती सदस्य पदाचाही राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे .