बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्राला अटक करण्यात आली असून सध्या त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. अश्लील व्हिडीओ बनवणे व अपलोड करण्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात सामील असलेल्या अनेकांची नावं आता हळूहळू समोर येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आता या प्रकरणातील उमेश कामत नावामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे.
मराठी अभिनेता उमेश कामतनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यानं म्हटलं आहे की ‘आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये या प्रकरणातील आरोपी ‘उमेश कामत’ याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे. या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल. या प्रकरणी संबंधित मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करेन.’
अश्लील व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्राचा एक्स मॅनेजर उमेश कामत याचं नाव समोर आलं आहे, मात्र काही माध्यमांनी बातम्या देताना चुकून मराठी अभिनेता उमेश कामतचा फोटो बातम्यांमध्ये वापरला आहे. त्यावरुन अभिनेता उमेश कामतने या वृत्तवाहिन्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठला आधी अटक करण्यात आली होती. तिच्या चौकशीतून राज कुंद्राचा एक्स मॅनेजर उमेश कामतचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर राज कुंद्राच या प्रकरणाचा सूत्रधार असल्याची माहिती समोर आली होती. सोमवारी रात्री राज कुंद्राला अटक करण्यात आली असून 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.