देशाची राजधानी असलेल्या दिल्लीवर करोनाच्या साथीची उग्र झालेली लाट आणि गंभीर हवा प्रदूषणामुळे दुहेरी संकट निर्माण झाले आहे. दिल्ली आणि आसपासच्या शहरांमधील वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले असून करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येतही विक्रमी नोंद असल्यामुळे सुमारे तीन कोटी रहिवाशांपुढे आरोग्य समस्यांचे उग्र आव्हान निर्माण झाले आहे. वाढत्या दैनंदिन रुग्णसंख्येमुळे दिल्ली ही करोना राजधानी होत असल्याची टीका दिल्ली उच्च न्यायालयाने केली आहे.
खरिपाचा हंगाम संपल्यानंतर हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तरांचल या शेजारी राज्यांमध्ये शेतातील कचरा जाळण्याच्या बाबतीत लक्षणीय घट न झाल्याने राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाने हिवाळ्याच्या प्रारंभीच धोकादायक स्तर गाठला आहे.