10 मे पासून सर्व लसीकरण केंद्रावर बँक कर्मचार्‍यांचे प्राधान्याने होणार लसीकरण

अहमदनगर(प्रतिनिधी)- अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्थेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे कोरोना लसीकरण होण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सहकार्य करण्याची मागणी शिवसेना व जिल्हा अग्रणी बँकच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी सर्व बँक कर्मचार्‍यांना प्राधान्याने कोरोना लसीकरण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले असून, याची सुरुवात दि.10 मे पासून शहरातील सर्व लसीकरण केंद्रावर होणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थाक संदीप वालावलकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
राज्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याकरिता राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. राज्य शासनाच्या 13 एप्रिलच्या ब्रेक द चेन या आदेशान्वये सर्व शासकीय कार्यालय, सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्था यांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करुन ते सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्था या नागरिकांच्या आर्थिक बाबींशी निगडित असल्याने या मधील कर्मचार्‍यांचा शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे जनतेशी संपर्क असतो. सध्या सर्व बँक व पतसंस्थेचे कर्मचारी फ्रन्टलाइन कर्मचारी म्हणून सेवा देत आहे. अनेक बँक कर्मचारींना कोरोनाची लागण झाली आहे. तर काहींचा यामध्ये जीव देखील गेला आहे. तरी देखील सर्व कर्मचारीची सेवा अविरत सुरु असून, त्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी त्यांचे लसीकरण करणे अत्यावश्यक असल्याने काही दिवसांपुर्वी मनपा उपायुक्त डॉ. प्रदिप पठारे यांना शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थाक संदीप वालावलकर व सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक अभिनव कुमार यांनी सदर मागणीचे निवेदन देऊन चर्चा केली होती. पुन्हा सदर मागणीसाठी शिष्टमंडळाने आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेतली असता, त्यांनी सर्व बँक कर्मचारींसाठी दि.10 मे पासून (45 ते 60 वयोगट) व 15 मे पासून (18 ते 45 वयोगट) ऑनलाईन नोंदणी करुन सर्व लसीकरण केंद्रावर प्राधान्याने लसीकरण करुन देण्याचे आश्‍वासन दिले आहे. बँक कर्मचारी यांचे लसीकरण होण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे यांनी केलेला पाठपुरावा व मनपाचे विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर तसेच मनपाचे सर्व अधिकारी वर्गाने केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हा अग्रणी बँकच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहे. या निर्णयाचे सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक अभिनव कुमार यांनी स्वागत केले आहे.
——————————————–
संकटकाळात सर्वसामान्य नागरिक दैनंदिन उदरनिर्वाह, कौटुंबिक खर्च व वैद्यकिय खर्चासाठी तर ज्येष्ठ नागरिक पेन्शनची रक्कम काढण्यासाठी जात आहे. लसीकरण झाले नसल्याने बँक कर्मचारीमध्ये देखील भिती होती. लसीकरणासाठी रांगेत उभे राहून मोठ्या प्रमाणात वेळ जात असल्याने काम सोडून कर्मचार्‍यांना लसीकरणासाठी जाता येत नव्हते. महापालिकेने बँक कर्मचार्‍यांच्या लसीकरणासाठी प्राधान्य देऊन केलेल्या सहकार्याने बँकिंग क्षेत्रातील कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. -संदीप वालावलकर (जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थाक)
——————————————–
कोरोनाच्या संकटकाळात गरजा पुर्ण करण्यासाठी पैश्याकरिता नागरिकांना बँकेत जावे लागते. बँकेवर ताण वाढला असून, अनेक कर्मचारी कोरोनाने बाधित झाले आहेत. तर अनेक कर्मचारींचा जीव देखील गेला आहे. तरी देखील ही सेवा नागरिकांच्या सोयीसाठी अविरत सुरु आहे. बँक कर्मचारींचा जीव मुठित घेऊन ते सेवा देत असताना त्यांचे लसीकरण झाल्यास भिती न बाळगता ते काम करु शकणार असून, यामुळे नागरिकांची देखील एकप्रकारे सोय होणार आहे. यासाठी शिवसेनेच्या वतीने बँक कर्मचार्‍यांचे लसीकरण होण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. – आनंद लहामगे (शिवसेना, जिल्हा उपप्रमुख)