माणुसकी व संवेदना संपत चालल्याने समाजातील प्रश्‍न गंभीर -न्यायाधीश भाग्यश्री पाटील

न्यायधीशांनी साधला बचत गटातील महिलांशी संवाद; स्टॉलवर जावून खरेदी केल्या वस्तू

नगर (प्रतिनिधी)- तंत्रज्ञानाच्या युगात माणुसकी व संवेदना संपत चालल्याने समाजातील प्रश्‍न गंभीर बनत चालले आहे. चौरंगावरील देवपूजेपेक्षा माणुसकी ईच खरी ईश्‍वर सेवा आहे. समाजात वृद्धाश्रमाची वाढती संख्या वेदनादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तथा न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी केले.
सावेडी, गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात सुरु असलेल्या सावित्री ज्योती महोत्सवात जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र, महापालिका व जय युवा अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बचत गटातील महिला व युवक-युवतींशी संवाद साधताना न्यायाधीश पाटील बोलत होत्या. यावेळी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश मनिषा चऱ्हाटे, कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश तेजस्विनी निऱ्हाळे, नगर शहर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे, सचिव ॲड. संदीप भुरके, उपाध्यक्ष ॲड. वैभव आघाव, खजिनदार ॲड. अनुराधा येवले, कार्यकारिणी सदस्य ॲड. रामेश्‍वर कराळे, ॲड. ज्योती हिमणे, ॲड. निखिल ढोले, ॲड. विजय केदार, ॲड. अभिजीत देशमुख, राजेंद्र उदागे, सुभाषराव सोनवणे, जयश्री शिंदे, स्वागत अध्यक्ष किशोर डागवाले, ॲड. मेहरनाथ कलचुरी आदींसह महिला व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे न्यायाधीश पाटील म्हणाल्या की, माणुसकी हीच आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहे. फक्त धार्मिक पुराने वाचून नव्हे, तर समाजातील ज्येष्ठांचा व महिलांचा सन्मान करुन समाज घडणार आहे. मुला-मुलीं मधील भेद संपवून मानसिकता बदलण्याची गरज आहे. वृद्धांसाठी असलेल्या कायद्याची व हक्काची त्यांनी माहिती दिली.
दिवाणी न्यायाधीश मनिषा चऱ्हाटे यांनी महिलांसाठी असलेले कायदे त्यांच्या संरक्षणासाठी आहे. कायद्याची सर्व महिलांना माहिती असणे आवश्‍यक असून, महिलांनी दाद मागितल्यास त्यांना न्याय मिळणार आहे. अन्याय-अत्याचार सहन न करता त्याविरोधात पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांसोबत काही गुन्हा घडत असल्यास त्याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला देण्याचे त्यांनी आवाहन केले. तर महिलांच्या हक्काचे रक्षण करणाऱ्या कायद्याची त्यांनी माहिती दिली.
न्यायाधीश तेजस्विनी निऱ्हाळे म्हणाल्या की, वाद निवारणामुळे वादी-प्रतिवादी यांचा वेळ व खर्च वाचतो. न्यायालयाची भीती न बाळगता दोन्ही पक्षकारांना आपले म्हणणे मांडता येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर अमली पदार्थ सेवनाचा प्रसार रोखण्यासाठी ही साखळी तोडणे महत्त्वाची आहे. यामध्ये हा साखली चालविणारा गंभीर गुन्हेगार आहे. युवकांनी आपल्या उज्वल भवितव्यासाठी अमली पदार्थापासून लांब राहण्याचे त्यांनी आवाहन केले.
नगर शहर बार असोसिएशनच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नूतन कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यांचा यावेळी उपस्थित न्यायधीशांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. न्यायाधीश पाटील, चऱ्हाटे व निऱ्हाळे यांनी महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देवून विविध वस्तूंची खरेदी केली. तर महिलांशी संवाद साधून बचत गट चळवळीची माहिती घेतली. या उपक्रमासाठी अनिल साळवे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, ॲड. भूषण बऱ्हाटे, दिनेश शिंदे, अमोल तांबडे, अनंत द्रविड, कावेरी कैदके, स्वाती डोमकावळे, अश्‍विनी वाघ, आरती शिंदे, जयेश शिंदे, ॲड. पुष्पा जेजुरकर, सुभाष जेजुरकर, विद्या शिंदे, रजनी ताठे, मीना म्हसे, शकील पठाण यांनी परिश्रम घेतले.