महाविद्यालयांमध्ये शिक्षकांपेक्षा बाउन्सर्सचा जास्त दबदबा!

अहिल्यानगर : जिल्हातील बहुतांशी महाविद्यालयांचा दरवाजा बाउन्सर्सनी अडवला आहे. गेटवर तसेच प्राचार्यांच्या केबिन बाहेरही ते दबा धरून आहेत. धट्टेकट्टे बाउन्सर्स विद्यार्थ्यांना धडकी भरवित आहेत. सुरक्षेसाठी त्यांना पाचारण करावे लागल्याचा महाविद्यालय प्रशासनाचा दावा आहे. नगर शहरातील अहमदनगर महाविद्यालय, न्यू आर्टस महाविद्यालय तसेच सारडा महाविद्यालयातही बाउन्सर्स आले आहेत. ग्रामीण भागातील महाविद्यालयातही या पहिलवानांचे सुरक्षा कडे आहे. महाविद्यालय म्हणजे शालेय जीवनातील कडक शिस्तीनंतर थोडीसी मौज करण्याचे ठिकाण. अभ्यासासोबत ग्रुप, कट्टा, कॅन्टीन असे वातावरण आतापर्यंत बहुतेक सर्वांनीच अनुभवलेय. यावर जरब ठेवण्यासाठी स्पोर्टस विभागाचा प्रमुख असायचा. खेळाचे शिक्षक सर्व विद्यार्थ्यांचे चाळे बंद करण्यासाठी पुरेसे असायचे. त्यांची देहयष्टी, आवाजच कॉलेज, शाळांतील वातावरण टाइट करायचा. परंतु कालौघात तेच मैदानावर जात नसल्याचे दिसते. काही सन्मानीय याला अपवाद आहेत. त्यामुळे क्रीडा शिक्षकाचा दबदबा कमी झाला. यातूनच विद्यार्थ्यांच्या ग्रुपने टोळ्यांचे रूप धारण केले. भांडण मारामाऱ्या पोलिस ठाण्यांपर्यंत जाऊ लागल्या. कॉलेजबाहेरची मंडळी राजकीय हस्तक्षेप करू लागली. दहशतीचे वातावरण तयार होऊ लागले. बऱ्याचदा शिक्षकांनाच मारहाण होऊ लागली. त्यामुळेच महाविद्यालयांनी अंतर्गत सुरक्षा ठेवण्यासाठी खासगी पैलवानांना द्वारपाल म्हणून ठेवल्याचे एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले. महाविद्यालयात बाउन्सर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांच्या स्वातंत्र्यावरही गदा आणली जात असल्याच्या तक्रारी आहेत. बऱ्याचदा त्यांच्याकडून मनमानी होत असल्याची उदाहरणे आहेत. एखादे पालक महाविद्यालयात आले तरी त्यांना प्राचार्यांच्या भेटीला जाऊ दिले जात नाही. साहजिकच त्यांच्याकडे ओळखपत्र नसते.