नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) – भ्रष्टाचाराला आळा घालणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने गुरुवारी दुपारी एक मोठी कारवाई करून चेहेडी गावातील तलाठी गौरव शंकर दवंगे (वय ३१, रा. अक्षर बंगला, निसर्ग नगर, म्हसरूळ) याला तब्बल ₹1,000 लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
प्रकरण असं की, चेहेडी गावातील एका वयोवृद्ध महिलेकडे सर्वे क्र. ४/१/ह/प्लॉट/११, क्षेत्रफळ ११९.५३१ चौ.मी. एवढा प्लॉट होता. वयोमानामुळे तिने हा प्लॉट आपल्या अपंग मुलगी आणि मुलाच्या नावावर बक्षीस पत्राद्वारे नोंदविण्याचा निर्णय घेतला. कागदपत्रांच्या प्रक्रियेसाठी तिने आपल्या भावाला अधिकार दिला होता.
भावाने संबंधित सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात दाखल केली, पण इथेच घडला प्रकार . तलाठी गौरव दवंगे यांनी सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी सरळसरळ ₹1,000 ची लाच मागितली!
तक्रारदाराने थेट ACB ला कळवून सापळा रचण्याचा निर्णय घेतला. आणि मग गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी दुपारी साधारण ४ वाजता, चेहेडी तलाठी कार्यालयात ठरल्याप्रमाणे व्यवहार झाला.
तक्रारदाराने पैसे देताच तलाठी दवंगे यांनी लाच स्वीकारली आणि त्याच क्षणी ACB पथकाने साक्षीदारांच्या उपस्थितीत त्याला गाठले!
या प्रकरणात तक्रारदाराच्या भावाने नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आरोपी तलाठीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा हंडोरे करत आहेत.
ही धडक कारवाई नाशिकचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात निरीक्षक सुवर्णा हंडोरे, हवालदार प्रफुल्ल माळी, नाईक विलास निकम आदींचा सहभाग होता.
ही कारवाई समाजात एक स्पष्ट संदेश देणारी ठरली आहे की, भ्रष्टाचार करणाऱ्यांना अजिबात सोडले जाणार नाही!
लोकांच्या हक्कासाठी उभं राहणं किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
मेट्रो न्यूजची ठाम भूमिका – लोकांनी धाडस करून अशा प्रकारच्या लाचखोरांना उघड करण्यासाठी पुढे यायलाच हवे. भ्रष्टाचाराला थारा नाही… आणि लाचखोर कितीही शहाणे असले तरी ACB च्या जाळ्यातून सुटणार नाहीत!