फडणवीस यांच्या निवासस्थानी गर्दी, मुख्यमंत्रिपदासाठी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा!
महाराष्ट्र : मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आता कोण विराजमान होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अशातच देवेंद्र फडणवीस एका सोहळ्याच्या निमित्ताने शहरात आले होते. दरम्यान, त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी हातात पुष्पगुच्छ घेऊन कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. काही कार्यकर्त्यांनी तेच पुढील मुख्यमंत्री व्हावेत, अशा भावना माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या. काही वेळानंतर फडणवीस विमानतळावरुन संभाजीनगर येथील एका सोहळ्यासाठी रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूर येथील देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ निवासस्थानी ‘महाविजयाचे शिल्पकार’ अशा आशयाचे मोठे होर्डिंग लागले आहे. महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री राहू शकतात, असे संकेत या होर्डिंगवरून मिळत आहेत.
मुख्यमंत्री कोण होणार, यावरून चर्चा रंगली होती, तो पेच आता सुटला असून देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असा कार्यकर्त्यांचा दावा आहे. ‘देवाभाऊ’ भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे होर्डिंग नागपूरच्या धरमपेठ परिसरात लावण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अभूतपूर्व विजयानंतर कार्यकर्त्यांनी हे होर्डिंग लावले आहे. झेंडा चौकात लावलेल्या होर्डिंगवर शिवसेना आमदार ॲड. आशिष जयस्वाल आणि भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.