कोरोनाच्या नावाखाली सुरु असलेली अनागोंदी थांबविण्यासाठी कायदाशाही राबविण्याची मागणी
टाळेबंदीत सर्व कारभार राम भरोसे सुरु असल्याचा आरोप
अहमदनगर:
कोरोनाच्या नावाखाली सुरु असलेली अनागोंदी थांबविण्यासाठी कायदाशाही राबविण्याची मागणी पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. तर कोरोना महामारीच्या टाळेबंदीत सर्व कारभार राम भरोसे सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना उपचारासाठी बेड, ऑक्सिजन व आवश्यक औषधे मिळत नाही. लसीकरणाचा देखील फज्जा उडाला आहे. कोरोनाच्या संकटकाळात राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप वाढला असून, ते स्वत:चे असतित्व सिध्द करण्यासाठी आवश्यक गोष्टी आरक्षित करत आहे. सर्वसामान्य नागरिकांना दाद दिली जात नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भांडण, चोर्या, मारामारी यामध्ये वाढ झाली असून, अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक कायदा हातात घेत आहे. स्वत:चे हित साधण्यासाठी धनदांडगे व्यक्ती देखील मस्तवालपणे वागत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळण्यासाठी कायदाशाही राबविण्याची गरज असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
हे ही अवश्य पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा :
कायदाशाही राबविताना शोषकांना संघटनेच्या वतीने जाब विचारला जाणार आहे. यामुळे कायदा हातात घेऊन वागणार्यांना वचक बसणार आहे. टाळेबंदीत माणुसकी बाजूला ठेऊन स्वत:चे हित साधण्यासाठी सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात निराशा येत आहे. सर्व सरकारी कार्यालय, न्यायालय आदी ठिकाणी सर्वसामान्यांची कामे रेंगाळली आहेत. सर्व अधिकारी, कर्मचारी पगार हमीवर असून, कार्य करीत नाही. लोकप्रतिनिधी देखील चुकीच्या पध्दतीने वागत असल्याने अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी कायदाशाही राबविण्याची गरज असल्याचे अॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. टाळेबंदीत कायदाशाही राबविण्यासाठी अॅड. गवळी, कॉ.बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा, जालिंदर बोरुडे, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.