🌟🙏 नगर कीर्तन यात्रेचे भव्य स्वागत – हिंद की चादर! श्री गुरु तेग बहादूर साहेबजींच्या 350 व्या शहीदी शताब्दीचे औचित्य 🎉🕊️
भारतातील 23 राज्यांमधून प्रवास करून श्री आनंदपुर साहेब, पंजाब येथे समारोप होणार आहे.
Share
नगर कीर्तन यात्रेचे भव्य स्वागत – हिंद की चादर! श्री गुरु तेग बहादूर साहेबजींच्या 350 व्या शहीदी शताब्दीचे औचित्य
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – हिंद की चादर! श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350 व्या शहीदी शताब्दी निमित्त अहिल्यानगरमध्ये बुधवारी (दि. 8 ऑक्टोबर) नगर कीर्तन यात्रेचे शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. गुरुद्वारा भाई दया सिंहजी गोविंदपुरा यांच्या वतीने जंगी स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. पारंपारिक ढोल-ताशाच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावाने यात्रेचे स्वागत करण्यात आले.
देशभरातून निघालेल्या ऐतिहासिक शहीदी नगर कीर्तन यात्रेने शहरात भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. ही पवित्र यात्रा गुरुद्वारा धुबरी साहेब आसाम येथून प्रारंभ झाली असून भारतातील 23 राज्यांमधून प्रवास करून श्री आनंदपुर साहेब, पंजाब येथे समारोप होणार आहे.
यात्रेत श्री गुरु ग्रंथ साहेबजींचे पवित्र स्वरूप तसेच गुरु साहिबान यांच्या ऐतिहासिक शस्त्र प्रमुख आकर्षण ठरले. बुधवारी ही यात्रा छत्रपती संभाजीनगर येथून प्रस्थान करून शेंडी बायपास चौक येथे पोहोचली, जिथे भव्य स्वागत झाले. त्यानंतर बाईक व कार रॅलीच्या स्वरूपात डीएसपी चौक पर्यंत यात्रा घेऊन आली.
डीएसपी चौक ते गुरुद्वारा भाई दया सिंहजी गोविंदपुरा पर्यंत यात्रेचा मार्ग वाजत-गाजत, भक्तिभावाने पायी पार पडला. मार्गावर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. विविध ठिकाणी इतर धर्मातील नागरिकांनीही श्रद्धेने यात्रेचे स्वागत केले.
शीख समाजातील युवकांनी पारंपारिक शस्त्र – लाठी, तलवार इत्यादींच्या माध्यमातून युद्धकलेचे धाडसी प्रात्यक्षिक सादर केले. या माध्यमातून एकतेचा, सौहार्दाचा आणि धार्मिक सहिष्णुतेचा संदेश देण्यात आला. गुरुद्वारा पोहोचल्यावर कीर्तन, कथा आणि लंगर सेवा पार पडली. भक्तांनी गुरु साहिबान यांच्या ऐतिहासिक शस्त्रांचे दर्शन घेतले आणि श्री गुरु ग्रंथ साहेबजींचा अभंग मनापासून अनुभवला.
या ऐतिहासिक नगर कीर्तनाच्या यशस्वी आयोजनासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त आणि जिल्हा प्रशासन यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल गुरुद्वारा समितीने विशेष आभार मानले.
यात्रेत उपस्थित होते – माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष हरजींदर सिंग धामी, जगदेव सिंग, रामसिंग बॉम्बे, तसेच जथ्थेदार बाबा रणजीत सिंगजी गुपतसर मनमाड. गुरुद्वारा भाई दया सिंहजी गोविंदपुरा आणि शीख समाजाचे अध्यक्ष बलदेवसिंह वाही, सचिव सतिंदरसिंग नारंग, तसेच सर्व समिती सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शीख समाज बांधवांनी या ऐतिहासिक शताब्दी समागमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
अध्यक्ष बलदेवसिंह वाही म्हणाले, “ही यात्रा श्री गुरु तेग बहादूर साहेबजींच्या बलिदानाचा आणि धर्म स्वातंत्र्याचा संदेश पोहचवणारी आहे. अहिल्यानगरातील संगतने आज अद्वितीय श्रद्धा, एकता आणि सौहार्दाचा आदर्श निर्माण केला आहे.”
ही पवित्र यात्रा सायंकाळी गोविंदपुर येथून पुढील प्रवासासाठी राहुरी-श्रीरामपूर मार्गे मनमाड कडे प्रस्थान केली.