क्रीडा शिक्षक महासंघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
जिल्हाध्यक्षपदी नंदकुमार शितोळे, सचिवपदी नितीन घोलप तर कार्याध्यक्षपदी अजित वडवकर यांची निवड
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची नुतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी नंदकुमार शितोळे (श्रीगोंदा), सचिवपदी नितीन घोलप (राहुरी) व कार्याध्यक्षपदी अजित वडवकर (कर्जत) यांची एकमताने निवड करण्यात आली. मागील पाच वर्षाच्या कालखंडात क्रीडा शिक्षक अधिवेशन, जिल्हा व राज्य पुरस्कार, शारीरिक शिक्षक संच मान्यता, ग्रेस गुण, पंच मार्गदर्शन शिबिरे व शिक्षकांच्या मदतीने पार पाडलेल्या विविध क्रीडा स्पर्धा यामुळे संघटनेचे काम राज्यभरात अग्रेसर राहिल्याची माहिती मावळते अध्यक्ष सुनिल गागरे यांनी दिली. तर संघटनेच्या स्थापनेपासून नगर जिल्ह्याने राज्य संघटनेच्या कार्यात सातत्याने पाठबळ दिल्याने शासनस्तरावर क्रीडा विषयक अनेक कामे मार्गी लागल्याचे प्रतिपादन मावळते सचिव शिरीष टेकाडे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा क्रीडा महासंघाची सर्वसाधारण सभा कृषी विद्यापीठ राहुरी येथे झाली. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यामधील बहुसंख्य शिक्षक सहभागी झाले होते. क्रीडा शिक्षकांच्या ऑनलाइन कामातील अडचणी, अग्रीम रक्कम, खेळाडू अपघात विमा, ग्रामीणसाठी असलेला 16 वर्षाचा शालेय वयोगट पुन्हा अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणे, खेळाडूंचे 5 टक्के आरक्षण कायम करण्यासाठी प्रयत्न करणे, जिल्हा, राज्यस्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचा पुरस्कार देवून सन्मान करणे, क्रीडा शिक्षक अधिवेशन आयोजित करणे, क्रीडा शिक्षक पद भरती, नवीन संचमान्यतेनुसार क्रीडा शिक्षकांच्या भरतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणे, शारीरिक शिक्षणाचे तास शारीरिक शिक्षकांनाच मिळावे अशा विविध विषयावर विचार मंथन व सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी क्रीडा महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी सर्व शिक्षकांना भविष्यातील शारीरिक शिक्षकांची पदे आणि क्रीडा विषयक समस्यांवर सखोल मार्गदर्शन केले.
क्रीडा संघाचे माजी अध्यक्ष सुनील गागरे, माजी सचिव शिरीष टेकाडे, सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, राज्य खजिनदार घनश्याम सानप व प्रशांत होन यांच्या निवड समितीने सर्वानुमते नवीन कार्यकारीणी जाहीर केली. नवीन कार्यकारिणीचा सत्कार माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिरीष टेकाडे, क्रीडा महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर, कोषाध्यक्ष घनःशाम सानप, महेंद्र हिंगे, प्राध्यापक व्याख्याते जितेंद्र मेटकर यांनी केला व नवीन पदाधिकाऱ्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी भारत तांबे, दादा गदादे, बबन लांडगे, अजय शिरसाठ, प्रतिक दळे, प्रकाश मोढे, पुरब सुर्यवंशी, शंकर हळणार, कुंडलिक शिरोळे, विनायक गोरे आदी उपस्थित होते.
–