दुसऱ्या विवाहातून जन्मलेल्या व्यक्तींनाही अनुकंपा तत्त्व लागू
हायकोर्टाचा मोठा निर्णय
हैदराबाद
एखाद्या व्यक्तीचं दुसरं लग्न झालं असेल तरी त्याच्या अपत्यांना पहिल्या लग्नापासून झालेल्या अपत्यांप्रमाणेच अधिकार मिळणार असल्याचं तेलंगणा उच्च न्यायालयानं सांगितलं आहे. अनुकंपा तत्त्वावरील नोकरी नाकारल्याप्रकरणी एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.
काय होतं प्रकरण?
तेलंगणामध्ये एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर मिळणारी नोकरी नाकारण्यात आली होती. या व्यक्तीचा जन्म दुसऱ्या लग्नापासून झाल्यामुळे ती ‘नाजायज’ असून अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी ग्राह्य धरता येणार नाही, असं सांगत त्याची नोकरीची संधी फेटाळण्यात आली होती. याविरोधात त्यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली आणि दाद मागितली.
हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा
असा झाला युक्तीवाद
याचिकाकर्त्याच्या वकिलांनी न्यायालयासमोर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या एका निकालाचा संदर्भ ठेवला. भारत सरकार आणि अन्य विरुद्ध व्ही. आर. त्रिपाठी या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय़ दिला होता. दुसऱ्या लग्नापासून झालेल्या संततीलाही अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवण्याचा अधिकार असल्याचा निर्णय न्यायालयानं दिला होता. या निकालाचा संदर्भ घेत तेलंगणा उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांच्या बाजूनं निकाल दिला.
काय म्हणालं न्यायालय?
दुसऱ्या लग्नापासून झालेल्या संततीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येणार नाही, असा कुठे लिखित नियम आहे का, अशी विचारणा न्यायालयानं सरकारला केली. असा लिखित नियम असेल, तर तो न्यायालयात सादर करावा अन्यथा यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेत या नियुक्तीला मंजुरी देण्यात यावी, असे आदेश कोर्टानं सरकारला दिले. सरकारनं याचिकाकर्त्यांच्या अर्जावर विचार करावा आणि सर्व निकषांची तपासणी करून त्यांच्या नोकरीबाबतचा निर्णय घ्यावा. मात्र केवळ दुसऱ्या पत्नीपासून झालेली संतती असल्याच्या कारणावरून त्यांचा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्याचा अधिकार हिरावून घेता येणार नाही, हे कोर्टानं स्पष्ट केलं.