राहुरी – वाढदिवसाचा आनंद क्षणात शोकात बदलला! काल (गुरुवार) सायंकाळी श्रीरामपूरच्या पाच मित्रांनी राहुरीतील मुळा धरण परिसरात वाढदिवस साजरा केला. पण, या पार्टीचा शेवट अत्यंत दुर्दैवी ठरला. शुभम लक्ष्मण घोडके (वय २४, रा. सम्राटनगर, सूतगिरणी, श्रीरामपूर) हा तरुण पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडला.
काय घडलं नेमकं?
काल सायंकाळी साधारण ६ वाजता, शुभम आणि त्याचे चार मित्र मरीआईची दरीजवळील धरण परिसरात पोहोचले. सर्वांनी एकत्रितपणे वाढदिवस साजरा केला, केक कापला आणि फोटोंमध्ये क्षण टिपले. पार्टी संपल्यानंतर, शुभम थर्माकॉलच्या तराफ्यावर बसून पाण्यात गेला. धरणाजवळ शेळ्या चारणाऱ्या आदिवासी समाजातील तरुणांनी त्याला सावध केले – “धरणात जाऊ नकोस, धोकादायक आहे!” मात्र शुभमने इशारा न जुमानता पाण्यात आणखी पुढे गेला. काही अंतरावर गेल्यावर तराफा उलटला आणि शुभम पाण्यात पडला.
मदतीचा प्रयत्न, पण मृत्यू ओढवला
त्याने किनाऱ्यावर पोहत येण्याचा प्रयत्न केला, पण दम तुटल्याने तो हळूहळू पाण्यात बुडू लागला.
मत्स्य प्रकल्पावरील आदिवासी तरुणांनी शौर्य दाखवत पाण्यात उडी मारली, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत उशीर झाला होता.
काही तरुणांनी त्याला पाण्याबाहेर काढले आणि ताबडतोब राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेले.
मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण क्षीरसागर यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
शुभम अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.
कुटुंबावर अचानक आलेल्या या आघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिस तपास सुरू
घटनेनंतर पोलिस नाईक गणेश सानप यांनी घटनास्थळी पंचनामा केला. राहुरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Metro News Analysis
हा प्रकार तरुणाईसाठी मोठा इशारा आहे . धरण, तलाव किंवा नदी परिसरात मजा करण्यापूर्वी सुरक्षिततेचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. थर्माकॉलसारख्या अस्थिर तराफ्यावर बसून पाण्यात जाणे जीवघेणे ठरू शकते. एक छोटा चुकीचा निर्णय संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उध्वस्त करू शकतो.
Metro News ची विनंती
धरण परिसरात जाणाऱ्या तरुणांनी पाण्यात जाण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. पालकांनी देखील आपल्या मुलांना सुरक्षिततेबाबत जागरूक करणे गरजेचे आहे. सेल्फी, पार्टी आणि थ्रीलसाठी जीव धोक्यात घालणे योग्य नाही!
शुभम घोडकेच्या निधनाने श्रीरामपूर आणि राहुरी परिसरात शोककळा पसरली आहे.
Metro News कडून श्रद्धांजली