विज्ञान दिनानिमित्त वंडर किड्स स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन!  

अहिल्यानगर  : वंडर किड्स स्कूल येथे विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पना प्रभावीपणे सादर केल्या. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ . दमयंती गुंजाळ (स्त्री रोग तज्ञ), लेखिका समिधा गुंजाळ आणि अविनाश क्लासेसचे संस्थापक श्री. अविनाश जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पना सादर केल्या असून, सर्जनशील प्रकल्प आणि नवकल्पना यांना मोठा प्रतिसाद मिळाला. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत विज्ञानाच्या माध्यमातून समाजहिताचे नवे शोध घेण्यास प्रवृत्त केले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला शाळेच्या संस्थापिका मिसेस वैशाली जाधव, प्राचार्या मोनिका दारवेकर, तसेच संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होता. विद्यार्थ्यांनी पाणीचे स्रोत (Sources of Water), वनस्पतींचा उपयोग (uses of Plants), सौरमंडळ (Solar System), तसेच प्राण्यांची निवासस्थाने (House of Animals) यांसारख्या रोचक प्रकल्पांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना उपस्थित पालक आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते, असे मत प्राचार्या मोनिका दारवेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या संस्थापिका मिसेस वैशाली जाधव यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. विज्ञानप्रेम वाढवण्यासाठी भविष्यातही अशा प्रदर्शनांचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.