खासगी वाहन चालकांकडून नागरीकांची लूट
नगर शहरात खासगी ट्रॅव्हल्स् एजंट अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत. याचा अनुभव महापालिकेतील एका अधिकार्याला आला. त्यांनी याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी चौघांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
महापालिकेचे अधिकारी राहुल किशोर अहिरे (रा. बॉम्बे बेकरी समोर, मुकुंदनगर, मुळे रा. आनंदनगर ता. मालेगाव जि. नाशिक) यांच्या फिर्यादीवरून सेवा ट्रॅव्हल्स्चे एजंट अमीर फारूख खान (रा. जुना बाजार, नगर), सोफियान बागवान (रा. पंचपीर चावडी), समशेर सलीम खान (रा. जुना बाजार, पंचपीर चावडी व एक अनोळखी इसम यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल आहिरे हे नगरहून जळगाव येथे जाण्यासाठी माळीवाडा परिसरातील सेवा ट्रॅव्हल कार्यालयासमोर गेले. ते तेथे उभ्या असलेल्या मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बसले असताना यावेळी चार इसमांनी त्यांना खाली उतरवले. चारशे रूपये तिकीट पडेल, असे सुनावले. मात्र, आहिरे यांनी 250 रूपये तिकीट असल्याने मी तेवढेच पैसे देणार, असे म्हणाले असता त्या चार इसमांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.