करुणा मुंडे यांनी घेतली त्या पिडीत महिलेची भेट
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिला नसल्याचा आरोप
नुकतीच शिवशक्ती सेनेची स्थापनेची घोषणा केलेल्या करुणा मुंडे यांनी सोमवारी (दि.7 फेब्रुवारी) लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी असलेल्या गोविंद मोकाटे याला अटकेची मागणी करणार्या पिडीत महिलेची भेट घेतली. तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याचा आरोप करुन, पिडीत महिलेला न्याय न मिळाल्यास महिला आयोगच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या घरा समोर आंदोलन करण्याचा इशारा मुंडे यांनी दिला आहे.
करुणा मुंडे यांनी आरपीआयच्या सर्जेपूरा कराचीवाला नगर येथील शहर संपर्क कार्यालयात पिडीत महिलेची भेट घेतली. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष गुलामअली शेख, संदीप वाघचौरे, संतोष पाडळे, नईम शेख, जमीर इनामदार, विशाल भिंगारदिवे, विजय शिरसाठ आदी उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या की, नगर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्याने महिलेवर अत्याचार केले असून, त्याला अद्याप अटक झालेली नाही. पिडीत महिलेला आरोपीला अटक व्हावी, या मागणीसाठी उपोषण करावे लागते ही शोकांतिका आहे. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहे. शिवशक्ती सेनेच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी जन आंदोलन छेडले जाणार आहे. शक्ती कायदा महाराष्ट्रात आनला मात्र त्याची अंमलबजावणी होण्याची गरज आहे. महिला आयोगाने अशा पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी भूमिका घ्यावी, अन्यथा महिला आयोग बरखास्त करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जेऊर (ता. नगर) येथील राजकीय पुढारी असलेल्या गोविंद मोकाटे याने महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला दोन महिन्यापुर्वी गुन्हा दाखल झाला होता. तर या प्रकरणात आरोपीवर अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे वाढीव कलम देखील लावण्यात आले आहे. मात्र दोन महिन्यापुर्वी लैंगिक अत्याचार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन देखील आरोपीला अटक होत नसल्याने, या प्रकरणाने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.