अर्बन’च्या चेअरमनपदी राजेंद्र अग्रवाल तर व्हाईस चेअरमनपदी दीप्ती सुवेंद्र गांधी
अर्बन बँकेवर स्व. दिलीप गांधी यांच्या सहकार पॅनेलने निविर्र्वाद वर्चस्व राखल्यानंतर बँकेच्या नुतन चेअरमनपदी राजेंद्र अग्रवाल तर व्हाईस चेअरमनपदी दीप्ती सुवेंद्र गांधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सहकार पॅनेलची ओळख ही गांधी गट म्हणूनच होती. सुवेंद्र गांधी यांच्याकडे सहकार पॅनेलची सर्व सुत्र होती. दरम्यान, पुन्हा एकदा अर्बन बँकेची सत्ता ही गांधी यांच्या अधिपत्याखालीच राहणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

अर्बन बँकेच्या १८ जागांसाठी निवडणूक झाली. त्यातील चार जागा अगोदराच बिनविरोध झाल्या होत्या. १४ जागांसाठी रविवारी मतदान झाले. या मतदानाची मतमोजणी अमरज्योत मंगल कार्यालय येथे मंगळवारी पार पडली. बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी बिनविरोध झालेले व विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र आयोजित सभासदांच्या सभेत दिले.

त्यानंतर लगेच अर्बन बँकेच्या मुख्य शाखेत सर्व संचालक मंडळाची चेअरमन-व्हाईस चेअरमन निवडीसाठी बैठक घेण्यात आली. त्यावेळी सर्वांच्या एकमताने चेअरमनपदी बँकेचे ज्येष्ठ संचालक राजेंद्र अग्रवाल तर व्हाईस चेअरमनपदासाठी स्व. दिलीप गांधी यांच्या स्नुषा व सुवेंद्र गांधी यांच्या पत्नी दीप्ती गांधी यांच्या नावाचा ठराव संचालकांच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यावेळी सर्व संचालकांनी एकमताने अग्रवाल व गांधी यांची एकमताने चेअरमन-व्हाईस चेअरमनपदी निवड केली. त्यानंतर संचालकांनी त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. या निवडी नंतर गांधी समर्थकांनी बँकेच्या बाहेर जल्लोष केला.