अहमदनगर जिल्ह्यातील १३६ नळपाणी योजनांना मान्यता

अहमदनगर — जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत पुनरुज्जीवित करावयाच्या ९३ कोटी ५९ लाखांच्या ९५ योजना व ४२ कोटी ७९ लाखांच्या ४१ नवीन योजना अशा १३६ कोटी ३८ लाख रुपये खर्चाच्या नगर जिल्ह्यातील १३६ नळ पाणीपुरवठा योजना मंगळवारी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा समितीचे सहअध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तथा सदस्य सचिव आनंद रुपनर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागाचे प्रकल्प संचालक संदीप कोहिनकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय मुळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक कदम तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

जल जीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असल्याने जिल्ह्यातील अस्तित्वातील पाणी पुरवठा योजना, नव्याने वाडी वस्ती यांना जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत दर दिवशी प्रति माणसी ५५ लीटर याप्रमाणे पाणीपुरवठा करण्याची योजना हाती घेण्यात आलेली आहे.