इनाम जमीन परस्पर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करू; आश्वासनानंतर महिलांचे उपोषण स्थगित

राहाता येथील इनाम जमीन परस्पर विक्री करणार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तीन महिलांचे सुरू असलेले उपोषण नायब तहसीलदार यांच्या हस्ते सोडविण्यात आले.
सविस्तर वृत्त असे कि, राहाता येथील इनाम जमिनीची परस्पर नोटरी करून विक्री करणार्‍या नागरिकांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी राहाता तलाठी कार्यालयासमोर मैनाबाई पवार, सरस्वती बर्डे, हिराबाई मोरे या तीन आदिवासी महिलांनी शनिवारी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला होता.सोमवारी 27 डिसेंबर रोजी उपोषणास बसलेल्या महिलांची दखल घेऊन तहसीलदार कुंदन हिरे यांनी नायब तहसीलदार भांगरे, तलाठी शिरोळे तसेच नगरपरिषदेत कार्यालयीन अधीक्षक नवनाथ जगताप व टाऊन प्लॅनिंगचे हसे यांना उपोषणास बसलेल्या महिलांची भेट घेऊन त्यांच्याकडून जमिनी बाबतची माहिती घेण्यास सांगून त्यांना नाय मिळेल अशी योग्य भूमिका घेण्याबाबत सूचना केल्या होत्या.नायब तहसीलदार भांगरे व नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी उपोषणास बसलेल्या महिलांचे मागण्यांचे म्हणणे ऐकून इनाम जमीन परस्पर विक्री करणार्‍या व्यक्तींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.