एस.पी.जे. स्पोर्टस क्लब व नगर रायझिंगच्या वतीने भुईकोट किल्ला ते स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंतच्या सायकल प्रवास करणार्‍या सायकलिस्टचा गौरव

शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला ते गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंतचा सायकल प्रवास करणार्‍या सायकलिस्टचा एस.पी.जे. स्पोर्टस क्लब व नगर रायझिंगच्या वतीने गौरव करण्यात आला.
शहरातील भुईकोट किल्ल्यात सरदार वल्लभभाई पटेल अडीच वर्ष बंदिवासात होते. या घटनेला 75 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त त्यांना अनोखी मानवंदना देण्यासाठी अहमदनगर सायकलिंग असोसिएशन तर्फे या राईडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी झालेल्यांचा डेक्कन क्लीफ हॅगर पुणे ते गोवा सायकल प्रवास करुन अमेरिकेतील रोड अक्रॉस अमेरिका या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पात्र ठरलेले शरद काळे पाटील, एस.पी.जे. स्पोर्टस क्लबचे संचालक संदीप जोशी, सायकलिस्ट तथा रनर अभिनंदन भन्साळी, डॉ. दिलीप पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


सायकलिस्ट शरद काळे पाटील यांनी सदृढ आरोग्यासाठी सायकल चालवणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. तर सायकलने प्रदुषण होत नसल्याने पर्यावरणाचा समतोल साधला जातो. इतर देशात मोठ्या प्रमाणात नागरिक सायकलचा वापर दैनंदिन वापरासाठी करतात. निरोगी जीवन व प्रदुषणमुक्त वातावरण राहण्यासाठी सर्वांनी सायकलचा उपयोग केला पाहिजे. सायकल चालविणे कमीपणाचे लक्षण असल्याची मानसिकता डोक्यातून काढण्याची गरज असल्याचे सांगितले. तर क्रीडा क्षेत्रात असलेल्या व्यक्तीच्या जीवनात शिस्त व कष्ट करण्याची तयारी या गुणांचा विकास होत असल्याचे स्पष्ट केले. देशपातळीवर अनेक सायकल चालविण्याच्या स्पर्धा होत असल्याची माहिती देऊन त्यांनी पुणे ते गोवा सायकल प्रवासाची माहिती दिली. संदीप जोशी यांनी शहरातील क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी एस.पी.जे. स्पोर्टस क्लब व नगर रायझिंग ग्रुप कार्य करत आहे. अनेक स्पर्धा घेण्यासाठी व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता संस्था प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर भुईकोट किल्ला ते गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंतचा 535 किलोमीटरचा प्रवासासाठी युवक-युवतींपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवून हे अंतर तीन दिवसात सायकलवर पूर्ण केल्याचे कौतुक केले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते भुईकोट किल्ला ते गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंतच्या सायकल रॅलीत सहभागी असलेले जया खंडेलवाल, नमन खंडेलवाल, रितेश खंडेलवाल, सचिन कराळे, श्याम मुळे, महेश सुरसे, सुनिल बनकर, प्राची पवार, संग्राम पवार, रघुनाथ वाघ, सचिन राणे, विकास जाधव, अभिजीत मिसाळ, विनायक नेवसे, नितीन शेराल, स्वप्निल कुर्‍हे, हरविंदरसिंग नारंग, प्रसाद भडके यांचा सत्कार करण्यात आला. या सायकल राईडमध्ये आलेले अनुभव सचिन राणे, प्राची पवार व रितेश खंडेलवाल यांनी विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कराळे यांनी केले. आभार श्याम मुळे यांनी मानले.