कल्याण रोड परिसराच्या विकासाठी 20 कोटी निधी दिल्याबद्दल महापौर रोहिणी शेंडगे यांचा सत्कार

नगर – कल्याण रोड हा नगर शहराच्या अत्यंत जवळचा भाग आहे. या भागात गेल्या काही वर्षांत होत असलेल्या विविध विकास कामांमुळे या भागात नवनवीन वसाहती निर्माण होत आहेत. येथील रहिवाशांना मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी प्रभागातील नगरसेवकांनी कोणत्याही प्रकारची कसर ठेवलेली नाही. प्रत्येक भागात रस्ते, लाईट, ड्रेनेज, पिण्याची लाईन आदि कामांमुळे नागरिकांना सुविधा मिळत आहेत. या भागाच्याच प्रतिनिधी असलेल्या महापौर रोहिणीताईंनी आत 20 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे, त्या माध्यमातून प्रलंबित अनेक कामे मार्गी लागून वसाहतींना सुविधा मिळणार आहेत. आम्ही सर्व नगरसेवक परिसराच्या विकासासाठी कटीबद्ध असून, विकासाची गंगा या भागात आणून परिसराचा कायापालट करत आहोत. महापौरांनी केलेल्या सहकार्यमुळे येथील सर्व नागरिकांच्यावतीने आम्ही त्यांचे अभिनंदन करतो, असे प्रतिपादन नगरसेवक सचिन शिंदे यांनी केले.

कल्याण रोड परिसरास 20 कोटीचा निधी दिल्याबद्दल नगरसेवक सचिन शिंदे यांच्यावतीने महापौर रोहिणी शेंडगे  व माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, महिला बाल कल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे, नगरसेवक शाम नळकांडे, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, निवृत्त प्राचार्य खासेराव शितोळे, पारुनाथ ढोकळे, अमोल शिंदे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, प्रथम मी या प्रभागाची प्रतिनिधी आहे, त्यामुळे आपल्या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास आपले प्राधान्य राहणारच. नागरिकांना मुलभुत सुविधा मिळाल्यापाहिजे यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. या भागाचे नगरसेवक सचिन शिंदे, पुष्पाताई बोरुडे, शाम नळकांडे हे नेहमीच प्रभागातील विकास कामांबाबत अग्रही असतात. शहराच्या प्रत्येक भागाचा विकास करुन आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यास सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.

याप्रसंगी पुष्पाताई बोरुडे, शाम नळकांडे, संभाजी कदम आदिंनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले तर आभार अमोल शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास परिसरातील आदर्शनगर, संभाजीनगर, सुयोग पार्क, विद्या कॉलनी, समतानगर, अमितनगर, विद्या टॉवर, आनंद पार्क, गणेशनगर, जिजाऊनगर, साईराम सोसायटी, शिवाजीनगर आदि परिसरातील नागरिक उपस्थित होते.