खेळाडू हा केंद्रबिंदू ठेऊन त्यांच्या विकासासाठी कार्य करणार -भाग्यश्री बिले

खेळाडू हा केंद्रबिंदू ठेऊन त्यांच्या विकासासाठी कार्य केले जाणार. क्रीडा अधिकारी म्हणून कार्य करताना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. खेळाडूंना आवश्यक असणार्‍या सेवा-सुविधा निर्माण करण्यास प्रथम प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन नव्याने हजर झालेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले.

वाडियापार्क येथील ज्येष्ठ नागरिक वॉकिंग ग्रुपच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा क्रीडा अधिकारी बिले यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अशोक बाबर, सुरेश कावळे, अनिल बाबर, शामराव एडके, रमेश बोरुडे, सुधीर काळे, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, अशोक सायंबर आदी उपस्थित होते.
जनरल बॉडी सदस्य अशोक बाबर यांनी वाडियापार्क क्रीडा संकुलाचे प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्यासाठी बिले यांनी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय असल्याचे स्पष्ट करुन, क्रीडा विकासाची अपेक्षा व्यक्त केली. पै. नाना डोंगरे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी बिले या स्वत: खेळाडू असल्याने त्यांना खेळाडूंच्या प्रश्‍नांची जाणीव आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार असून, क्रीडा सकुलाचे प्रश्‍न देखील सुटणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली.