जमीन मोजणीचे पैसे भरुन वर्ष होऊनही मोजणी झाली नसल्याने पारनेर भूमिअभिलेख कार्यालयाच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याची मागणी

अन्याय निवारण समितीचे भूमि अभिलेख उपसंचालकांना निवेदन

जमीन मोजणीचे पैसे भरुन वर्ष होऊन देखील मोजणी केली जात नसल्याने पारनेर भूमिअभिलेख कार्यालयाच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी भूमि अभिलेखचे उपसंचालक (पुणे) यांना पाठविले आहे.
पारनेर तालुक्यातील मौजे वडगाव सावताळ येथील शासकीय जमीन गट क्रमांक 585 मध्ये अतिक्रमण झाल्याने अनेक वेळा तक्रार करून सदर गटाची हद्द निश्‍चित करण्यासाठी ग्रामपंचायतीने मोजणी फी 22 जानेवारी 2021 रोजी भूमिअभिलेख पारनेर येथे भरली होती. मात्र सदर जमीनीवरील अतिक्रमणधारकांशी अर्थपूर्ण संबंध ठेवून मोजणी केली गेली नसल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
सदरची जमीन गट क्रमांक 585 ही जिल्हा परिषद मालकीचा असून, सदर पाझर तलावासाठी भूसंपादन करण्यात आलेली आहे. त्या जमिनी स्थानिक लोकांनी ग्रामपंचायत वडगाव सावताळ यांच्याशी संगनमत करून स्थानिक नोंद करून अनियमितता केली आहे. परंतु 585 हद्द कायम करण्यासाठी ग्रामपंचायतीने मोजणी शुल्क भरुन देखील त्याची अद्यापि मोजणी न केल्याने अशा बेजबाबदार अधिकार्‍यांची चौकशी होऊन दप्तर दिरंगाईप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास 21 फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त नाशिक येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.