जातीव्यवस्था संपविण्यासाठी नॉन-जेनेटिक इर्न्फमेशन रिव्होल्यूशन मोहिम पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार

भारतात शेकडो वर्षे टिकून असलेली जातीव्यवस्था संपविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने नॉन-जेनेटिक इर्न्फमेशन रिव्होल्यूशन मोहीम राबविण्यास पुढाकार घेतला असून, या मोहिमेच्या माध्यमातून युवक-युवतीं समोर वैज्ञानिक दृष्टीकोन ठेऊन जातीव्यवस्था मोडीत काढण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
धर्मांतराने जातीव्यवस्था संपली नाही, तर आरक्षणासाठी देशव्यापी मोर्चे, संप वाढत आहेत. सत्तेसाठी जातीमंडुक पुढार्‍यांचे पेव फुटले आहे. भारतातील जातींच्या उतरंडीमुळे संपूर्ण समाज उच्च-निच्च या दोन गटात विभागला गेला आहे. तीस ते पस्तीस टक्के लोकांना मानवी सन्मान सहजासहजी उपलब्ध होत नाही. उच्च जातीत जन्मलेल्यांनी फुकटची प्रतिष्ठा आणि सन्मान जपून ठेवण्यामध्ये आणि खालच्या वर्गात जन्मलेल्या लोकांना स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देखील इतर लोकांप्रमाणे मानवी सन्मान मिळालेला नाही. धर्मांतरामुळे जातीव्यवस्था संपली नाही, तर जातीचे प्रमाणपत्र मिळून अल्पसे लाभ मिळवण्यासाठी फार मोठा समाज आजही मोर्चे आंदोलनामध्ये अग्रणी असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
उन्नत चेतना, तूफानी ऊर्जा आणि उच्च महत्वकांशा राबविण्यामुळेच समाज पुढे जाऊ शकणार आहे. जगभरातील कोणताही धर्म भारतातील जाती संस्था मोडीत काढू शकणार नाही. जातीसंस्था ही एक व्यापक सामाजिक मेकॅनिझम आहे. विश्‍वातील छोट्या किंवा मोठ्या प्रत्येक बाबींमध्ये माहिती आणि त्यांचे आदेशाप्रमाणे कृती केली जाते. अशा वेळेस फक्त नॉन-जेनेटिक इर्न्फमेशन रिव्होल्यूशन हा एकच मार्ग जातिसंस्था संपवण्यासाठी उपलब्ध असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. जातीचा उगम जन्मामुळे मिळत नसून, जातीबाबतची कोडीफाईड इन्फॉर्मेशन व त्याबाबतचे सामाजिक मेकॅनिझम मोडीत काढण्यासाठी विज्ञानाच्या मदतीने यश येऊ शकणार आहे. त्याचबरोबर भारतातील शाळा-कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये क्रांती घडवून आणावी लागणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. जाती व्यवस्था मोडीत काढण्याची इच्छा असणार्‍या सर्वांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, जालिंदर बोरुडे, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.