जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र व जय असोसिएशन ऑफ एनजीओच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त उपक्रम

आपले उचित ध्येय पूर्तीसाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजे. ध्येयप्राप्तीसाठी परिश्रमाशिवाय पर्याय नाही. परिश्रम करणार्‍यांमागे यश आपोआप चालून येते. सामाजिक परिवर्तनासाठी प्रत्येक क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढला तरच सामाजिक क्रांती घडेल. युवा म्हणजे ऊर्जा असून, ऊर्जेचा उपयोग योग्य दिशेने होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आधारवड संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. अनिता दिघे यांनी केले.
जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र, जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य आयोजित राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या उद्घाटनाप्रसंगी अ‍ॅड. दिघे बोलत होत्या. नेहरु युवा केंद्रात झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय असोसिएशन ऑफ एनजीओचे राज्य अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, रयतचे पोपट बनकर, उडान फाऊंडेशनच्या आरती शिंदे, भारती शिंदे, संजय भिंगारदिवे, डॉ. संतोष गिर्‍हे, ह.भ.प. अ‍ॅड. सुनिल महाराज तोडकर, अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर, रमेश गाडगे, दिनेश शिंदे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.
महेश शिंदे म्हणाले की, आजच्या युवकांनी स्वामी विवेकानंद यांची तर युवतींनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून समाजोपयोगी उपक्रम घेऊन सामाजिक क्रांती घडवून आणली पाहिजे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी युवा वर्गाचा सहभाग नेतृत्व महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रमाता जिजाऊच्या वेशभूषेत आलेल्या ऐश्‍वर्या बनसोडे यांनी सर्वांचे लक्ष वेधले. राष्ट्रीय युवा सप्ताहामध्ये निबंध, चित्रकला स्पर्धा, व्याख्याने, स्वच्छता अभियान, मतदार जागृती, वृक्षरोपण आदींसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट बनकर यांनी केले. आभार आरती शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, विशाल गर्जे, नेहरू युवा केंद्राचे राज्य उपनिदेशक शिवाजी खरात, सिद्धार्थ चव्हाण आदींचे मार्गदर्शन लाभले.