जीवनात पैशापेक्षा रुग्णसेवा महत्त्वाची -पद्मश्री पोपट पवार

रामचंद्र खुंट येथील केअर अ‍ॅण्ड क्युअर हॉस्पिटलमध्ये दंत विभागाचे उद्घाटन

प्रामाणिक व सामाजिक बांधिलकी ठेवल्यास प्रत्येक क्षेत्रात यश आहे. जीवनात पैशापेक्षा रुग्णसेवा महत्त्वाची असून, त्या दृष्टीने प्रत्येक डॉक्टरने योगदान दिले पाहिजे. चुकीची आहार पध्दतीमुळे मौखिक आरोग्याचे मोठे प्रश्‍न भेडसावत असून, उत्तम दंत चिकित्सकाची गरज भासत असल्याचे प्रतिपादन राज्य आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपट पवार यांनी केले.
शहरातील किंग रोड, रामचंद्र खुंट येथील केअर अ‍ॅण्ड क्युअर हॉस्पिटलमध्ये नव्याने सुरु करण्यात आलेल्या दंत विभागाचे उद्घाटन पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रफिक सय्यद, उद्योजक हाजी शौकत तांबोली, सहाय्यक कामगार आयुक्त मोहसिन सय्यद, अभय आगरकर, उबेद शेख, हसन राजे, हाजी अब्दुस सलाम, सिताराम खिलारी, माजी उपमहापौर हाजी नजीर शेख, डॉ. कुदरत शेख, डॉ. सईद शेख, दंतरोग तज्ञ डॉ. आयशा राजे (शेख), डॉ. जाहीद शेख, डॉ. सादिक राजे, डॉ. मारिया शेख आदी उपस्थित होते.
पुढे पद्मश्री पवार म्हणाले की, डॉ. सईद यांनी एका पत्र्याच्या शेडमध्ये ओपीडी करून गरीब रुग्णांना आधार दिला. मोठे हॉस्पिटल झाले तरी, त्यांची ही सेवा अविरत सुरु आहे. परिस्थितीची जाणीव ठेऊन डॉ. सईद व त्यांच्या मुलांची रुग्णसेवा सुरु आहे. तर डॉ. आयशा शेख यांचे सासरे हसन राजे हे एक प्रगतशील शेतकरी असून, त्यांचे देखील सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात डॉ. सईद शेख यांनी बिकट परिस्थितीवर मात करून रुग्णसेवेचे व्रत अविरत सुरू ठेवले. गरिबीतून आलो असल्याने सर्वसामान्यांची जाणीव असून, सामाजिक बांधिलकी ठेवून कार्य सुरू आहे. या यशात मोठे बंधू माजी समाज कल्याण विभागाचे उपायुक्त मुश्ताक शेख यांचा सिंहाचा वाटा आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अविरतपणे रुग्णसेवेचे कार्य इतरांच्या हॉस्पिटल मध्ये केले. या रुग्णांच्या आशीर्वादाने स्वतःचे हॉस्पिटल उभे केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हाजी शौकत तांबोळी यांनी डॉ. सईद यांच्या वडिलांच्या पुण्याईने त्यांच्या कुटुंबाची भरभराट झाली. त्यांचे वडिल यतिमखाना संस्थेचे विश्‍वस्त होते. त्यांनी समाजाची मोठी सेवा केली. हा वारसा शेख परिवार आरोग्य सेवेतून पुढे चालवत असल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक कामगार आयुक्त मोहसिन सय्यद यांनी मुस्लिम समाजात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. मात्र आयशा शेख ही मुलगी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर झाली. मुलगी काय करू शकते? हे तिने आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले. हाजी नजीर हुसेन डॉ. सईद सेवाभावाने कार्य करत आहे. अनेक गोरगरीबांचे मोफत शस्त्रक्रिया त्यांनी केले असून, सामाजिक संस्थेत देखील त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
दंतरोग तज्ञ डॉ. आयशा राजे (शेख) यांनी दात हा शरीराचा महत्त्वा घटक असून, त्याचे विकार सुरु झाल्यावर त्याचा त्रास व महत्त्व समजते. मात्र दात चांगले राहण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. दातांची नियमित तपासणी करणे आवश्यक असून, ते उत्तम राहण्यासाठी काळजी घेणे हा उत्तम पर्याय आहे. हॉस्पिटलमध्ये अद्यावत दंत उपचार पध्दतीवर असणारे सर्व उपचार सुविधा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करुन, युवकांमध्ये गुटखा, तंबाखू व सिगारेटमुळे मौखिक आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होऊन कॅन्सर देखील होत आहे. यासाठी हॉस्पिटलच्या माध्यमातून जनजागृती करुन दंत तपासणीचे मोफत शिबीर देखील घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उबेद शेख यांनी केले. आभार डॉ. मारिया शेख यांनी मानले.