डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पाडलेल्या भिंतीचा वाद पेटला

भिंत पाडणार्‍या व सदर जागेची विटंबना करणार्‍यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

दोन दिवस उलटून देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकची भिंत पाडणार्‍यावर कायदेशीर कारवाई होत नसल्याने गुरुवारी (दि.27 जानेवारी) शहरातील समस्त आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने महापालिके समोर धरणे आंदोलन करुन आयुक्त शंकर गोरे यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भिंत पाडणार्‍या व सदर जागेची विटंबना करणार्‍यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यावेळी आंबेडकर चळवळीतील अजय साळवे, सुमेध गायकवाड, प्रा. जयंत गायकवाड, नितीन कसबेकर, महेश भोसले, अमित काळे, गौतमी भिंगारदिवे, योगेश थोरात, विशाल गायकवाड, आरती शेलार, नगरसेवक अक्षय उन्हवणे, विशाल कांबळे, नयन खंडारे, शैनेश्‍वर पवार, दया गजभिये, मीरा गवळी, सनी माघाडे, रविंद्र कांबळे, मंगेश मोकळ, प्रविण वाघमारे, विशाल बेलपवार, विक्रम चव्हाण, महेश भिंगारदिवे, नाना पाटोळे, सिध्दार्थ सिसोदे, मेहेर कांबळे, शाहरुख शेख, अक्षय वाघचौरे आदी उपस्थित होते.
टिळक रोड येथे महापालिकेच्या मालकिचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ही वास्तू आहे. या वास्तूची संरक्षक भिंत शेजारी बांधकाम करणार्‍या व्यावसायिकाने व एका खाजगी हॉस्पिटल चालकाने पाडल्याचे मंगळवारी (दि.25 जानेवारी) निदर्शनास आले. या वास्तूच्या मोकळ्या जागेत हॉस्पिटलने आपली पार्किंग व्यवस्था केली आहे. तर शेजारी बांधकाम करणारा व्यावसायिकाने वास्तूचा उपयोग आपल्या इमारतीच्या बांधकामाचे साहित्य ठेवण्यासाठी केला आहे. त्याचप्रमाणे आणखी एका व्यावसायिकाच्या संरक्षक भिंती शेजारी जनावरांचा गोठा असून, त्या जनावरांची विष्ठा तो स्मारकामध्ये अनधिकृतपणे टाकून स्मारकाची दैनंदिन विटंबना करीत असल्याचा आरोप आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी केला आहे. या ठिकाणी नियुक्त केलेले महापालिकेचे कर्मचारी हे देखील त्यांच्यात सामील असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या कृत्यामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकची भिंत पाडणार्‍यावर व सदर सदर जागेची विटंबना करणार्‍यावर महापालिकेच्या वतीने गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.