तर तो व्हिडिओ सार्वजनिक करण्याशिवाय पर्याय नाही – देवेंद्र फडणवीस

उपमुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनिल देशमुख यांना इशारा

मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. तीन वर्षांपूर्वी फडणवीस यांनी त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला होता. महाविकास आघाडीविरोधात खोटे शपथपत्र दाखल करण्यासाठी दबाव आणल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे. ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा चुकवायचा असेल तर खोटे शपथपत्र दाखल करण्यासाठी फडणवीस यांच्या जवळील व्यक्तीने सांगितल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. देशमुखांचे म्हणणे आहे. याविषयी आपण फडणवीस यांच्याशी थेट संवाद साधल्याचे देशमुख म्हणाले. तर या प्रकरणात आता फडणवीस यांनी देशमुखांना इशारा दिला आहे. फडणवीस यांचा एक हितचिंतक आपल्याला अनेकदा भेटला. त्याने फडणवीस आणि आपल्यामध्ये फोनवरुन चर्चा घडवून आणली. फडणवीस यांनी आपल्याशी संपर्क साधला आणि काही कागदपत्रे पाठवत असल्याचे सांगितले. अजित पवार यांच्याविरोधात आरोप करणे शक्य नसेल तर उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्याविरोधातील शपथपत्रावर स्वाक्षरी करण्याचा आग्रह धरला. आपण त्याला नकार दिल्याचे देशमुख म्हणाले. मुंबईचे माजी पोलीस संचालक परमबीर सिंह यांच्याशी संबंधीत हा वाद असुन सिंह यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोपा लावला होता. आपल्याविरोधात पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी जो आरोप लावला, त्यामागे फडणवीस यांचा कट असल्याचा आरोप देशमुख यांनी लावला. फडणवीस यांनी हा आरोप फेटाळला आहे. देशमुख यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांकडे ऑडिओ आणि व्हिडिओ आहेत. जर माझ्याविरोधात असेच खोटे आरोप होत राहिले तर नाईलाजाने मला हे ऑडिओ आणि व्हिडिओ सार्वजनिक करावे लागतील, असा इशारा फडणवीस यांनी अनिल देशमुखांना दिला.