दादाभाऊ कळमकर यांनी माणसे घडविण्याचे काम केले – किरण काळे

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी आ. दादाभाऊ कळमकर यांनी नगर जिल्हा व शहरातील राजकीय चळवळीमध्ये अनेक माणसे घडविण्याचे काम केले आहे. नवोदित चेहऱ्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणत नेतृत्व करण्याची संधी त्यांनी अनेकांना दिली असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते काँग्रेस पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये दादाभाऊ कळमकर यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्ष नेता दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, क्रिडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हा प्रभारी अनीस चुडीवाला, ज्येष्ठ नागरिक मंचाचे आप्पासाहेब खताडे आदी उपस्थित होते.

काळे यावेळी म्हणाले की, देशाचे नेते खा. शरदचंद्र पवार यांचा विश्वास संपादन करणे ही साधारण गोष्ट नाही. पवार यांचा विश्वास संपादन करत दादाभाऊ यांनी अनेक वर्ष शहर व जिल्ह्यात नेतृत्व केले. आजही त्यांची शरद पवार यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. पवारांच्या जुन्या विश्वासू सहकार्‍यांमध्ये दादाभाऊ असून पवारांनी देखील त्यांची आजवर कधीच साथ सोडली नाही.

दादांनी आपल्या अनेक वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये शहरातील अनेक नवोदित कार्यकर्त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांना कायम बळ देण्याचे काम केले. आज यातील अनेक लोक महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून काम करत आहेत. तर काहींना दादाभाऊ यांच्यामुळेच विधिमंडळाची पायरी चढण्याची संधी मिळाली असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

दादांनी तरुण पिढीला मार्गदर्शन करत राहावे :
आजही दादांना मानणारा मोठा वर्ग नगर शहरामध्ये व जिल्ह्यात आहे. त्यांच्या अनेक वर्षांच्या राजकीय अनुभवाचा उपयोग तरुण पिढीला होऊ शकतो. अलीकडे दादा थोडेसे कमी सक्रिय दिसत असले तरी त्यांनी नवीन पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम सातत्याने सुरू ठेवावे अशी भावना यावेळी किरण काळे यांनी व्यक्त केली.

फोटो ओळी : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी आ.दादाभाऊ कळमकर यांचे वाढदिवसानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिष्टचिंतन करताना शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे. समवेत दशरथ शिंदे, अनंतराव गारदे, खलील सय्यद, मनोज गुंदेचा, प्रवीणभैय्या गीते पाटील, मोहनराव वाखुरे,अनीस चुडीवाला, आप्पासाहेब खताडे आदी.