नागपूरचे माजी महापौरांनी केलेल्या जातीवाचक वक्तव्याचा निषेध
गुन्हा दाखल होण्यासाठी चर्मकार संघर्ष समितीची मागणी
नागपूरचे माजी महापौरांनी चर्मकार, खाटीक व नाभिक समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देऊन, तोफखाना पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे, राज्य संघटक नंदकुमार गायकवाड, मुख्य सल्लागार अभिजित शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा मीनाताई गायकवाड, गीता कांबळे, रोहिदास उदमले, अभिजीत खरात, मेजर बाबासाहेब तेलोरे, देविदास कदम, सुनील केदार, वंदना गायकवाड, बापूसाहेब देवरे आदी उपस्थित होते.
नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे प्रत्यक्ष दर्शनाचे विधान करताना चर्मकार, खाटीक व नाभिक समाजाविषयी जातीवाचक अश्लील भाषेत उद्गार काढले. तुच्छतादर्शक जातीवाचक भाषा वापरून अनुसूचित जातींची त्यांनी निंदा केली आहे. जातीयता विचार रुजवण्याचे काम त्यांनी केले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
नागपूरचे माजी महापौरांनी केलेल्या वक्तव्यामुळे संबंधित समाजबांधवांच्या धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या गेल्या असल्याचे स्पष्ट करुन या घटनेचा चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वये गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.