नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस

महापौरांचे मुख्यमंत्री यांना पत्र

शासनाची तसेच कोणत्याही संस्थेकडून आर्थिक मदत न घेता गेल्या तीस वर्षापासून मोफत नेत्र शिबीर घेऊन अडीच लाखापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया घडविणारे नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांची पद्मश्री पुरस्कारासाठी भारत सरकारकडे शिफारस करण्याच्या मागणीचे पत्र शहराच्या महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविले आहे.
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीच्या वतीने नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल महापालिकेत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर शेंडगे यांनी त्यांचा सत्कार करुन सामाजिक कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा या भावनेने मुख्यमंत्री यांना पत्र पाठवत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, गणेश कवडे, श्याम नळकांडे, संजय शेंडगे, प्रशांत गायकवाड उपस्थित होते.
महापौर रोहिणी शेंडगे यांनी बोरुडे यांचे निस्वार्थ भावनेने सुरु असलेले कार्य प्रेरणादायी आहे. दीनदुबळ्यांची सेवा त्यांच्याकडून घडत आहे. लाखो दुर्बल घटकांना नवदृष्टी मिळाली असूम, कोरोना काळातही ही सेवा अविरत सुरु राहिली. त्यांना पद्मश्री मिळाल्यास शहराचे नाव उंचावले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर फिनिक्स सोशलफाउंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक मोफत शिबिरे आयोजित करून सर्वसामान्य गरजू रुग्णांच्या मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्या आहेत. आज पर्यंत त्यांनी 2 लाख 84 हजार 752 गरजूंवर मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया घडवून आनल्या. नेत्रदान चळवळीत भरीव कार्य करून 1 हजार 290 नेत्रहिनांना मरणोत्तर नेत्रदानातून नवदृष्टी मिळाली आहे. त्यांनी हे कार्य स्वखर्चातून उभे केले असून, ते अविरतपणे सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन बोरुडे यांची भारत सरकारकडे पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करण्याचे महापौर यांनी पत्रात म्हंटले आहे.